लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रीत्यर्थ केंद्र सरकारच्या सूचनेनुसार विविध उपक्रम मुंबई महापालिकेमार्फत राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून 'कचऱ्यापासून कला' या विषयावर प्रदर्शन लवकरच भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यास इच्छुक संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
‘आजादी का अमृत महोत्सव' हा उपक्रम केंद्र सरकारने आयोजित केला आहे. केंद्राच्या नागरी व गृहनिर्माण मंत्रालयाच्या निर्देशानुसार २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीमध्ये विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यानुसार कचऱ्याचे विलगीकरण करणे, जनसहभागातून सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता, ‘कचऱ्यापासून कला’ संकल्पनेवर प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तसेच सफाईमित्र अमृत सन्मान समारंभ, असे विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत.
कोविडच्या पार्श्वभूमीवर निर्बंधांचे पालन करीत हे उपक्रम राबविले जाणार आहेत. १ ऑक्टोबर रोजी ‘कचऱ्यापासून कला’ या संकल्पनेवर मुंबईमध्ये प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांनी, आपल्या संस्थेचा पूर्ण तपशील ‘greenmumbai.report@gmail.com’ या ई-मेलवर २६ सप्टेंबरपर्यंत पाठवावा. त्यानुसार निवड केलेल्या संस्थांशी संपर्क साधण्यात येईल, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.