मुंबई: लंडनस्थित भारतीय चित्रकार उदयराज गडनीस यांचे 'दुर्गासप्तशती' चित्रकृतींचे प्रदर्शन वरळी येथील नेहरु सेंटर कला दालनात आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २६ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत खुले राहणार आहे. या प्रदर्शनात दुर्गा मातेच्या श्लोकांचे तत्त्वज्ञान, त्यातील आध्यात्मिक शक्ती व भक्ती विविध चित्रांद्वारे साकारली आहे.
२०२० मध्ये जेव्हा कोरोना महामारीच्या काळात दुर्गासप्तशतीचे ध्यान केले. त्या ग्रंथावर प्रेरित होऊन गडनीस यांनी त्यावर आधारित १८० चित्रांची ही चित्रमालिका तयार केली. विशेष म्हणजे त्यांनी ही चित्रे १८० दिवसात रेखाटली असून ही सर्व चित्रे एकाच दालनात प्रदर्शित केली आहेत. दुर्गासप्तशतीचे १३ अध्याय आहेत. त्यात एकूण ७०० श्लोक आहेत, त्या श्लोकांवर आधारित त्यांनी ही चित्रमालिका साकारली आहे. गडनीस यांनी सादर केलेल्या या चित्रमालिकेत दुर्गा देवीच्या विविध रूपाचे दर्शन होते. त्या विविधतेत अनेक आध्यत्मिक शक्तिस्थानांचे दर्शन घेण्याचा मोह कुणालाही आवरणार नाही, इतकी ती चित्रे गुंतवून ठेवणारी आहेत. अनेक बलस्थाने असणाऱ्या या कलाकृती रसिकांना एकाग्र करणाऱ्या आहेत. प्रत्येक चित्र हे रसिकांना वेगवेगळा अनुभव देणारे आहे. प्रत्येक चित्राचे सूक्ष्म निरीक्षण केल्यास त्यातला आध्यात्म नेमकेपणाने गवसतो आणि तो क्षण आध्यात्मिक शक्तीची अनुभूती देणारा ठरतो.
गेल्या १५ वर्षांपासून उदयराज गडनीस लंडनमध्ये स्थायिक आहेत. मागील ३५ वर्ष गडनीस कलाक्षेत्रात कार्यरत असून त्यांनी आत्तापर्यंत ३००० च्यावर विविध आध्यात्मिक विषयावर चित्रे साकारली आहेत. त्यांची देश – विदेशात अनेक प्रदर्शन भरली असून त्यांना कला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. २०१७ मध्ये त्यांनी मुंबईत नेहरू सेंटर मध्ये सूर्य मालिकेवर आधारित चित्र प्रदर्शन भरविले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता.