जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये 'रान'चित्रांचे प्रदर्शन; आनंद पांचाळ यांच्या कुंचल्यातून अवतरले निसर्गरंग
By संजय घावरे | Published: September 6, 2023 08:45 PM2023-09-06T20:45:11+5:302023-09-06T20:45:22+5:30
मूळ लातूरमधील असलेल्या चित्रकार आनंद पांचाळ यांच्या 'रान' या चित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीतील दोन क्रमांकाच्या कलादालनात भरवण्यात आले आहे.
मुंबई - मूळ लातूरमधील असलेल्या चित्रकार आनंद पांचाळ यांच्या 'रान' या चित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीतील दोन क्रमांकाच्या कलादालनात भरवण्यात आले आहे. ५ सप्टेंबर रोजी सुरू झालेले हे प्रदर्शन ११ सप्टेंबरपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात 'रान' या संकल्पनेवर आधारलेली विविध आकारांतील ३० चित्रे रसिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
आर्ट क्रिटिक्स प्रयाग शुक्ला यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलाने या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी वरीष्ठ चित्रकार विनोद शर्मा, चित्रकार चरण शर्मा, चित्रकार लक्ष्म येले, आनंद पांचाळ, दिल्लीहून आलेले चित्रकार आसित पटनाईक उपस्थित होते. या प्रदर्शनाला चित्रकार अरुणांशु चौधरी, 'श्लोक'च्या संस्थापिका शीतल दर्डा यांच्यासह बऱ्याच मान्यवरांनी भेट दिली आहे. लातूरमध्ये लहानाचे मोठे झालेल्या आनंद पांचाळ यांनी शिक्षणासाठी गाव सोडले, पण जमिनीशी जोडलेली त्यांची नाळ कधीच तुटली नाही. जमिन, शेती, रान, वावर हे त्यांनी फार जवळून पाहिले आहे. त्याचेच प्रतिबिंब 'रान' या चित्रप्रदर्शनात उमटल्याचे पांचाळ यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. ते म्हणाले की, यापूर्वीही मी बऱ्याच विषयांवर चित्रांच्या सिरीज केल्या आहेत, पण शेती आणि रानबाबत नेहमीच कुतूहल असते. प्रवास करताना नेहमीच निसर्गातील वस्तू, रंग, आकृत्या खुणावत असतात. त्या रंगांच्या आधारे कागदावर उतरवतो. मातीसोबतचे माणसाचे ऋणानुबंध कधीच तोडता येत नाहीत. त्याबद्दलची आत्मीयता कायम माझ्या मनात असते. यापासूनच जगाची उत्पत्ती झालेली असून, आजही बरेच काही घडत आहे. तोच जिव्हाळा 'रान'मधील चित्रांद्वारे सादर करण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले.
माती, दगड-धोंडे, पाने, फुले, ऋतु यांचा धांडोळा पांचाळ यांनी 'रान'च्या माध्यमातून घेतला आहे. ऋतुंमध्ये बदलणाऱ्या मातीच्या रंगांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. यासाठी जवळपास सर्वच रंगांचा वापर केला असला तरी, ग्रे शेडकडे झुकणारे रंग विशेष वापरण्यात आले आहेत. ३० चित्रांच्या या प्रदर्शनात काही ब्लॅक अँड व्हाईट चित्रेही आहेत. ९ बाय ५ फूटांचे चित्र सर्वात मोठे असून, ८ बाय १० इंचांचे सर्वात लहान चित्र आहे. पांचाळ यांनी मागील दोन वर्षे या सिरीजवर काम केले आहे. १९९७मध्ये जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतल्यापासून आजवर पांचाळ यांच्या चित्रांची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप चित्र प्रदर्शने भरवली गेली आहेत.