Join us  

चित्रकार नामदेव पाटील यांचे 'श्री गणेश' मालिकेवरील कलाकृतींचे प्रदर्शन 

By संजय घावरे | Published: September 03, 2024 7:59 PM

गणरायाच्या नानाविध रुपांचा कलाविष्कार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई - ऐन गणेशोत्सवाच्या वातावरणात मुंबईकरांना कॅनव्हासवर अवतरलेल्या श्री गणेशाच्या विविध रूपांचे दर्शन घडत आहे. चित्रकार नामदेव पाटील यांच्या श्री गणेशाच्या विविध रूपांच्या कलाकृतींचे प्रदर्शन नरिमन पॉइंट येथील फ्री प्रेस हाऊस कलादालनात भरवण्यात आले आहे.विद्या आणि कलेची देवता असलेल्या गणेशाची विविध रूपे रसिकांना, कलाकारांना मोहित करतात.

अनेक कलाकार, चित्रकार गजाननाच्या याच मोहक रूपाच्या प्रेमात पडून स्वतःच्या शैलीत श्रीगणेशाला कागदावर उतरवतात. अध्यात्मिक, परमार्थिक असे अलौकिक चित्र दृश्यरूपाने रसिकांसमोर सादर करतात. चित्र आणि शब्द यांनी ओथंबलेला असा हा प्रत्येक आविष्कार भक्तिरसाचा अमृतथेंब वाटतो, इतका तो अप्रतिम असतो. अंत:करणातून उमटलेली कलाकृती, कलाकाराच्या सश्रद्ध दृष्टीने पाहता एक वेगळा आनंद देऊन जाते. सध्या तमाम रसिक फ्री प्रेस कलादालनात असाच काहीसा सुंदर अनुभव घेत आहेत. १ सप्टेंबरपासून सुरू झालेले हे प्रदर्शन १५ सप्टेंबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कला रसिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. 

चित्रकार नामदेव पाटील यांनी आपले कलाशिक्षण कला निकेतन कोल्हापूर येथे पूर्ण केले. वास्तववादी शैलीतील दर्जेदार चित्रनिर्मितीत (व्यक्तिचित्रे, प्रसंगचित्रे, निसर्गचित्रे) त्यांचा हातखंडा आहे. या प्रदर्शनात त्यांनी तैलरंगाच्या माध्यमातून गणेशाची रूपे अगदी सहजतेने रेखाटली आहेत. यासाठी त्यांनी कॅलिग्राफीचा आधार घेतला आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक विषयांवर विविध शैलीतून चित्रे साकारली आहेत. २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी त्यांनी आपल्या पेंटिंगच्या सानिध्यात घालवला आहे.

टॅग्स :गणेशोत्सवगणपती 2024गणेश चतुर्थी २०२४