प्रदर्शनात समग्र महाराष्ट्राचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 03:42 AM2018-02-20T03:42:10+5:302018-02-20T03:42:24+5:30
मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्समध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाच्या माध्यमातून समग्र महाराष्ट्राचे दर्शन घडविण्यात आले आहे
मुंबई : मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्समध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाच्या माध्यमातून समग्र महाराष्ट्राचे दर्शन घडविण्यात आले आहे. बीकेसीच्या मैदानावरील हे प्रदर्शन म्हणजे मिनी महाराष्ट्र आहे. प्रदर्शनात प्रामुख्याने पाच सभागृहे आहेत. मुंबई, नागपूर-अमरावती, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद यांचा त्यात समावेश आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. या आर्थिक राजधानीचे पश्चिमेकडील प्रवेशद्वार म्हणजे ऐतिहासिक गेटवे आॅफ इंडिया. या वास्तूच्या प्रतिकृतीने प्रवेशद्वार सजले आहे. तर नागपूर विभागाचे प्रवेशद्वार दीक्षाभूमीच्या संकल्पनेने नटले आहे. औरंगाबादसाठी अजिंठ्याच्या लेण्या, नाशिकसाठी दादासाहेब फाळके चित्रनगरीची प्रतिकृती आणि पुण्यासाठी शनिवारवाड्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.नागपूर-अमरावतीच्या प्रदर्शनात कापसावर आधारित उद्योग आहेत. अमरावतीमधील वस्त्रोद्योग पार्कचे मार्केटिंग त्याद्वारे करण्यात आले आहे. त्याचवेळी नागपुरातील बहुचर्चित आंतरराष्ट्रीय मिहान प्रकल्पाचा स्टॉलही आहे. पुणे हे आॅटोमोबाइल क्लस्टर आहे. यामुळे त्याच्याशी संबंधित गुंतवणुकीतील संधी पुण्याच्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर दिसून येतात. औरंगाबाद हे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व आॅटोच्या सुट्या भागांचे केंद्र आहे. त्याचे सादरीकरण तेथे करण्यात आले आहे. तर नाशकात फळ प्रक्रिया केंद्रावर आधारित उद्योगांना असलेला वाव सादर करण्यात आला आहे.