Join us

जुईनगरमध्ये शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन

By admin | Published: March 02, 2015 3:00 AM

महाराष्ट्राला स्वराज्य मिळवून देणाऱ्या शिवकालीन शस्त्रांची ओळख नवी मुंबईकरांना व्हावी, शस्त्रांच्या माध्यमातून त्यावेळचा इतिहास उलगडावा

नवी मुंबई : महाराष्ट्राला स्वराज्य मिळवून देणाऱ्या शिवकालीन शस्त्रांची ओळख नवी मुंबईकरांना व्हावी, शस्त्रांच्या माध्यमातून त्यावेळचा इतिहास उलगडावा याकरिता राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ आणि विजय फाउंडेशनच्यावतीने आज जुईनगर येथील गावदेवी मैदानामध्ये शिवकालीन शस्त्रे आणि शिवकालीन नाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. शिवाजी महाराजांचे कार्य फक्त इतिहासापुरतेच मर्यादित न राहता शिवाजी महाराजांचे किल्ले, त्यांनी जिंकलेली युध्दे, त्यात वापरलेली शस्त्रे यांची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविली जात आहे. या प्रदर्शनात २०० हून अधिक शस्त्रे मांडण्यात आली आहेत. यात मराठा, मुघल, राजपूत तलवार, मराठा धोप, पट्टा, समशेर खंडा, पदकुंत, अश्वकंत, गजकुंज आदी प्रकारातील भाले, मराठा कट्यार, मुघल कट्यार, हैद्राबादी कट्यार, चामड्याच्या कातडीपासून तयार केलेल्या ढाली, शमशेर, पोलादी भाला, तोफ, गोळे, मुठींचे विविध प्रकार, वेगवेगळ्या प्रकारची वाघनखे, अस्वल पंजा आदी शस्त्रे शिवप्रेमींचे लक्ष वेधून घेत होती. या सर्व शस्त्रांचे संकलन शिरीष जाधव यांनी केले आहे. शस्त्रांबरोबर शिवाजी महाराजांच्या काळातील तांबे, पितळ, चांदी आणि सोन्याची नाणी, त्यावर छापलेल्या शिवाजी महाराजांच्या विविध मुद्रा, वर्षाची माहिती असलेले १०० हून अधिक नाणी प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली आहेत. प्रसारक मंडळाचे सदस्य आणि पदाधिकारी प्रदर्शन बघायला येणाऱ्यांना प्रत्येक शस्त्राची नावे आणि युध्दातील वापर आदीची माहिती सांगत होते. ज्यातून नागरिकांना शिवकालीन इतिहासाची माहिती मिळाली.राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय खिलारे, नूतन खिलारे आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)