Join us  

विद्यमान ४४ नगरसेवकांना तिकीट मिळालेच नाही

By admin | Published: April 09, 2015 4:57 AM

महापालिकेच्या स्वीकृतसह ९४ नगरसेवकांपैकी विद्यमान ४४ नगरसेवकांना निवडणुकीसाठी उमेदवारी मिळालेली नाही. आरक्षणामुळे सभागृहात

नामदेव मोरे, नवी मुंबईमहापालिकेच्या स्वीकृतसह ९४ नगरसेवकांपैकी विद्यमान ४४ नगरसेवकांना निवडणुकीसाठी उमेदवारी मिळालेली नाही. आरक्षणामुळे सभागृहात जाण्याचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले असून, अनेकांनी नातेवाइकांची वर्णी लावून घेतली आहे, तर जवळपास ३० माजी नगरसेवक यावेळी पुन्हा नशीब अजमावत आहेत. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून १११ प्रभागांसाठी तब्बल ९१३ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. महापालिकेची स्थापना झाल्यापासून मागील २० वर्षांमध्ये ३२५ जण नगरसेवक झाले आहेत. यामधील संतोष शेट्टी हे एकमेव नगरसेवक चारही वेळा निवडून आले आहेत. विठ्ठल मोरे व साबू डॅनिअलही १९९५ पासून सभागृहात आहेत. परंतु, त्यांना अनुक्रमे १ व २ वेळा स्वीकृत सदस्य व्हावे लागले होते. विद्यमान स्थितीमध्ये ८९ लोकनियुक्त व ५ स्वीकृत असे ९४ सदस्य आहेत. यामधील ५० नगरसेवक पुन्हा नशीब आजमावत आहेत. ४४ जणांना निवडणुकीला उभेच राहता आलेले नाही. आरक्षणामुळे अनेक नगरसेवकांना फटका बसला आहे. यामध्ये काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, माजी विरोधी पक्षनेते मनोज हळदणकर, दिलीप घोडेकर व इतरांचा समावेश आहे. बहुतांश नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागांमध्ये नातेवाइकांची वर्णी लावून घेतली आहे. ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल मोरे, अनंत सुतार, संतोष शेट्टी यांनी शेजारच्या प्रभागांमध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी ३० पेक्षा जास्त माजी नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये माजी महापौर मनीषा भोईर, शिवसेनेचे माजी जिल्हा अध्यक्ष विजय चौगुले, माजी सभागृह नेते जे. डी. सुतार यांचा समावेश आहे. सुरेश भिलारे, रविकांत म्हात्रे या विद्यमान नगरसेवकांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. अनेक नगरसेवकांनी स्वत:ची पत्नी, मुलगी व इतर नातेवाइकांना उमेदवारी मिळवून दिली असून राजकारणातील घराणेशाही कायम राहील याची दक्षता घेतली आहे. यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांवर विशेषत: महिला कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.