मुंबईत सध्याच्याच निर्बंधांना दिली पालिकेने २७ जूनपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:06 AM2021-06-22T04:06:22+5:302021-06-22T04:06:22+5:30
सावधगिरीची भूमिका : महापालिका आयुक्तांकडून परिपत्रक जारी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना पॉझिटिव्हिटीच्या दरात घट झाल्याने राज्य ...
सावधगिरीची भूमिका : महापालिका आयुक्तांकडून परिपत्रक जारी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना पॉझिटिव्हिटीच्या दरात घट झाल्याने राज्य सरकारच्या निकषानुसार मुंबईचा पहिल्या टप्प्यात समावेश झाला आहे. मात्र लोकसंख्या, लोकलमध्ये होणारी गर्दी व तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता सध्याच्या निर्बंधांमध्ये कोणतेही बदल न करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मुंबईत २७ जूनपर्यंत लेव्हल ३ नुसार निर्बंध कायम राहणार आहेत. याबाबत मुंबई पालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सुधारित परिपत्रक जारी केले.
मुंबईत सध्या रुग्ण पॉझिटिव्हिटीचा दर ३.९७ टक्के आहे. तर ऑक्सिजन खाटांच्या व्याप्तीचा दर २३.५६ टक्के इतका आहे. त्यामुळे सध्या मुंबईत लेव्हल-३ चे निर्बंध कायम ठेवण्यात आले असल्याचेेे पालिकेने स्पष्ट केले आहे.
मुंबई लेव्हल-३ कशासाठी?
शहराची भौगोलिक रचना आणि लोकसंख्या, मुंबईत लोकलने दररोज येणारे प्रवासी आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत तज्ज्ञांनी वर्तवलेली शक्यता, यामुळे मुंबईत लेव्हल-३ चे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पालिका प्रशासनाने दिला आहे.
सर्वसामान्यांना लोकल प्रतीक्षा
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमधून दररोज सुमारे ७० ते ८० लाख प्रवासी प्रवास करतात. लोकल प्रवास सर्वांसाठी सुरू केल्यास संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे तूर्तास तरी रेल्वे सर्वसामान्यांसाठी सुरू न करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
काय सुरू, काय बंद?
अत्यावश्यक दुकाने सर्व दिवस आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ४ खुली राहतील.
माॅल्स, चित्रपटगृह सर्व बंद, हाॅटेल्स सोमवार ते शुक्रवार ५० टक्के सायं. ४ पर्यंत खुली राहतील. त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल, शनिवार - रविवार बंद राहतील.
खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सायंकाळी ४ वाजेपर्यंत तर शासकीय कार्यालय ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.
लग्नसोहळे ५० टक्के क्षमतेने तर अंत्यविधीत सहभागी होण्यासाठी २० लोकांना मुभा असेल.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी व त्यानंतर संचारबंदी.