शिवाजी मंदिराचा विलोभनीय देखावा

By Admin | Published: September 23, 2015 02:34 AM2015-09-23T02:34:26+5:302015-09-23T02:34:26+5:30

देशातील विविध प्रार्थनास्थळांचे हुबेहूब देखावे सादर करून मुंबईकरांना त्याचे दर्शन घडवणाऱ्या चेंबूरच्या सह्याद्री क्रीडा मंडळाने यंदा शिवाजी महाराजांच्या मंदिराचा देखावा उभारला आहे

Exotic looks of Shivaji temple | शिवाजी मंदिराचा विलोभनीय देखावा

शिवाजी मंदिराचा विलोभनीय देखावा

googlenewsNext

मुंबई : देशातील विविध प्रार्थनास्थळांचे हुबेहूब देखावे सादर करून मुंबईकरांना त्याचे दर्शन घडवणाऱ्या चेंबूरच्या सह्याद्री क्रीडा मंडळाने यंदा शिवाजी महाराजांच्या मंदिराचा देखावा उभारला आहे. यंदा गणपतीची मूर्तीदेखील शिवाजी महाराजांच्याच वेषातील असल्याने ती सर्वांच्याच आकर्षणाचा विषय ठरत आहे.
मुंबई शहर हे घड्याळाच्या काट्यावर धावणारे शहर आहे. या ठिकाणी राहणाऱ्या सामान्य माणसाची नेहमीच कामासाठी धावपळ सुरू असते. कामातून वेळ काढून मुंबईकरांना अन्य राज्यात जाऊन प्रार्थनास्थळांना भेट देणे शक्य होत नाही. ही बाब हेरून गेल्या अनेक वर्षांपासून सह्याद्री क्रीडा मंडळाकडून मुंबईकरांसाठी प्रतिदेखावे तयार करण्यात येत आहेत. कधी पुण्याचा शनिवारवाडा, दिल्लीचा लालकिल्ला, लहान मुलांसाठी डिस्नी लँड, तर कधी प्रति वाराणसी अशा प्रकारचे विविध देखावे आतापर्यंत या मंडळाकडून साकारण्यात आले आहेत. तर २०१३ला चित्रपटसृष्टीला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण फिल्मसिटीचा देखावा या ठिकाणी उभा करण्यात आला होता.
यावर्षीदेखील काहीतरी वेगळे करण्याचा मानस मंडळाच्या कार्यकर्त्यांचा होता. त्यामुळे शिवाजी महाराजांचे मंदिर उभारण्याची योजना मंडळाने आखली. त्यानुसार गेली दोन महिने शंभर कामगारांनी अहोरात्र काम करून शिवाजी महाराजांचा मंदिराचा देखावा उभा केला आहे. या ठिकाणी शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती तसेच तुळजाभवानी मातेचे मंदिरदेखील उभारण्यात आले आहे. आर्ट डायरेक्टर राहुल परब यांनी यांनी हा देखावा या ठिकाणी उभारला आहे. यात शिवाजी महाराजांची विविध दुर्मीळ छायाचित्रेही लावण्यात आली आहेत. गुरुवारी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते या देखाव्याचे उद्घाटन झाल्यानंतर तो सर्वांसाठी खुला करण्यात आला. सध्या या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा भाविकांची अधिक गर्दी असल्याची माहिती सह्याद्री क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राहुल वाळंज यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Exotic looks of Shivaji temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.