उच्चभ्रू सोसायटीला पडलाय विळखा विदेशी गांजाचा; ६० टक्के तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 10:38 AM2021-06-20T10:38:02+5:302021-06-20T10:38:15+5:30
तरुणाईने नशेच्या आहारी जाऊन आपले जीवन उद्ध्वस्त न करण्याचा निर्धार करणे आवश्यक आहे. 26 जून रोजी असलेल्या जागतिक अमली पदार्थविरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर या काळ्या विश्वावर दृष्टिक्षेप...
रोना महामारीमुळे सर्वच जण चार भिंतीआड कैद झाले. परिणामी सोशल मीडियावरील वावर कमालीचा वाढला. बदलत्या काळानुसार ड्रग्ज तस्कर, ड्रग्ज डीलर आणि नशेबाजांनीही सोशल मीडियाच्या ऐसपैस प्लॅटफॉर्मचा आधार घेतला आहे. त्यातच पारंपरिक गांजा आणि चरसचे स्वरूप बदलून आता त्यांची जागा विदेशी गांजाने घेतली आहे. जमीनविरहित, केवळ पाणी आणि कार्बन वायूआधारे (हायड्रोपोनिक) पद्धतीने तयार केलेल्या गांजाची लोकप्रियता सध्या शिगेला पोहोचली आहे. उच्चभ्रू वसाहतीमध्ये राहणाऱ्या धनाढ्यांमध्ये याची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे.
पोलीस कारवाईचा अडथळा टाळत डार्कवेब आणि बिटकॉइनद्वारे एका क्लिकवर या विदेशी गांजाची घरपोच सेवा उपलब्ध होत असल्याने तरुणाईचा याकडे कल आणखी वाढला आहे. ही बाब सर्वाधिक धोकादायक आणि चिंताजनक आहे. आंतरराष्ट्रीय अमली पदार्थविरोधी दिनाच्या निमित्ताने तरुणाईने नशेच्या आहारी जाऊन आपले जीवन उद्ध्वस्त न करण्याचा निर्धार करणे आवश्यक आहे.
जिथे पारंपरिक गांजाची किंमत प्रतिकिलो १० ते १५ हजार आहे तिथे १ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा ५ ते १० हजार रुपयांत विकला जात आहे. मुंबईतील कुलाबा, गिरगाव, मरिन लाइन्स, वरळी, दादर, वांद्रे, खार, जुहू, सांताक्रूझ, अंधेरी, ओशिवरा, मालाड, मढ, मार्वे, गोराई अशा उच्चभ्रू वस्त्यांमध्ये याच्या सेवनाचे प्रमाण कमालीचे वाढत आहे.
महागड्या किमतीमुळे हायड्रोपोनिक गांजा हा श्रीमंतांचा गांजा म्हणून ओळखला जातो. पोलीस कारवाईत अडकू नये म्हणून ही टेक्नोसॅव्ही मंडळी ड्रग्ज खरेदीसाठी डार्क वेबभोवती कोंडाळे करताना दिसत आहे. डार्क वेब हा इंटरनेटचा असा कोपरा आहे जिथे सर्व काळे धंदे चालतात. इथे किती वेबसाइट आहेत, किती डीलर आहेत, खरेदी करणारे किती आहेत. याची माहिती मिळविणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळेच डार्क वेबवर चालणाऱ्या या कारभाराचा पसारा किती आहे याचा अंदाजही लावता येत नाही. ओपन इंटरनेट आणि सर्वसामान्य सर्च इंजिनवर होणाऱ्या कामांवर लक्ष ठेवणे सोपे असते; पण डार्क वेबवर निगराणी ठेवणे कठीण आहे.
या ऑनलाइन मंडईत होणाऱ्या व्यवहारांसाठी पैशांची देवाणघेवाण बिटकॉइनद्वारे केली जाते. हे डिजिटल स्वरूपाचे चलन आहे. त्यामुळे त्याच्या उलाढालीचा मागोवा घेणेही अवघड आहे. त्यामुळे अशा पडद्याआड असलेल्या ड्रग्ज तस्कर, पुरवठादारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान यंत्रणांसमोर उभे ठाकले आहे. मुंबईत एमडी ड्रग्जबरोबर एलएसडीच्या तस्करीतही वाढ होत
असून, त्यासाठीही डार्कवेबचा आधार घेतला जात
आहे.
६० टक्के तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात
अलीकडेच झालेल्या एका सर्वेक्षणात ६० टक्के तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात अडकल्याचे वास्तव समोर आले आहे. यात १८ ते ३५ वयोगटातील मुला-मुलींचा समावेश आहे, तर तस्करी, विक्रीच्या कारवाईत अटक करण्यात आलेली मुले १८ ते २५ वयोगटातील आहेत.
आपली मुले करतात काय?
बेकरीच्या नावाखाली ड्रग्ज तस्करी करणाऱ्या १८ आणि १९ वर्षीय दोघा तरुणांना नुकत्याच एनसीबीने बेड्या ठोकल्या. यातील एकाचे वडील बंगळुरू येथे, तर दुसऱ्याचे कुटुंब गोव्यामध्ये राहते. इथे मुलाला दीड कोटीचा फ्लॅट देऊन पालक मंडळी निवांत होते. छानछोकीचे जीवन जगण्यासाठी ही मंडळी ड्रग्ज तस्करीत अडकली. पालकांनी पाल्य काय करतो यावर लक्ष ठेवायला हवे. आपला मुलगा एकटा राहतोय का? त्याचा इंटेरनेटवर वावर वाढलाय का? यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, तसेच काही चुकीचे आढळून आल्यास तत्काळ एनसीबीची मदत घेतली पाहिजेे.
डी गँगच्या जागेवर आफ्रिकन पसरवताहेत जाळे
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर सुरू झालेल्या अमली पदार्थ सेवनासह ड्रग्ज विक्री आणि तस्करीच्या एनसीबीच्या तपासात केवळ बॉलिवूड सेलिब्रिटीच नव्हे, तर बडे उद्योगपती, व्यावसायिक, धनाढ्य आणि राजकारणी व्यक्तींची नावेही समोर आली आहेत. यातील काही बडे मासे एनसीबीच्या गळालाही लागले आहेत; पण या प्रकरणात एक नाव समोर आले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. ते नाव आहे, केम्स कॉर्नर येथील सुप्रसिद्ध मुच्छड पानवाला. हा तोच मुंबईचा करोडपती मुच्छड पानवाला आहे, ज्याचे ग्राहकही करोडपती आहेत. त्यानंतर पुढे हा तपास कुख्यात मोस्ट वाँटेड डॉन दाऊद इब्राहीम याच्या मुंबईतील ड्रग्ज सिंडिकेटपर्यंत पोहोचला.
डी गँगच्या उद्ध्वस्त होत असलेल्या जागेवर आफ्रिकन, नायजेरियन, साउथ आफ्रिकन नेटवर्क उभे करतात. टुरिस्ट व्हिसावर मुंबईत यायचे. व्हिसा संपेपर्यंत थांबायचे. अथवा एखाद्या गुन्ह्यात अटक व्हायचे. पुढे, नियमानुसार गुन्हा निकाली लागेपर्यंत देश सोडता येत नाही. याच संधीचा फायदा घेत ही मंडळी नालासोपारा, खारघर या भागात भाड्याने रूम घेऊन राहतात आणि घरातच ड्रग्ज फॅक्टरी चालवून हायड्रोपोनिक पद्धतीने तयार केलेल्या शेतीवर भर देतात. (शब्दांकन : मनीषा म्हात्रे)