मुंबई : महापालिकेच्या वतीने २०१५ वर्षाकरिता श्री गणेश गौरव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, इच्छुक मंडळांनी स्पर्धेकरिता पूर्ण भरलेले अर्ज १८ सप्टेंबरपर्यंत सायंकाळी ४ वाजेपर्यंत जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्या मंडळांना एकूण १ लाख ४० हजार रुपयांची रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन महापालिकेकडून गौरविण्यात येणार आहे.गणेशमूर्तीची सुबकता, मूर्तीसभोवतालची आरास, त्यासाठी निवडलेल्या विषयाचा आशय, त्याची मांडणी, मंडळाने केलेली सामाजिक कार्ये, परिसर स्वच्छता तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवाच्या काळात महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेला दिलेला प्रतिसाद, स्वच्छता तसेच जनहिताचे संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेले विशेष कार्य, जैविक कचऱ्याचे विघटन करण्यास दिलेली चालना, गणेशोत्सव काळात पर्यावरण मैत्रीला दिलेले महत्त्व इत्यादी निकष पुरस्कारांची निवड करताना विचारात घेण्यात येणार आहेत.जी गणेशोत्सव मंडळे गेली पाच वर्षे गणेशोत्सव साजरा करीत आहेत, उत्सव साजरा करण्यासाठी ज्या मंडळांकडे महापालिका, वीज कंपन्या, पोलीस खाते यांचे आवश्यक असलेले परवाने आहेत, अशी मंडळेच या स्पर्धेत भाग घेऊ शकतील. पालिकेने नियुक्त केलेले विविध क्षेत्रातील तज्ज्ञ परीक्षकांची समिती स्पर्धेत भाग घेण्यास पात्र असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार भेट देतील. अंतिम फेरीनंतर ही परीक्षक समिती स्पर्धेचा निकाल बंद लिफाफ्यात प्रशासनाला सादर करेल. (प्रतिनिधी)
गणेश गौरव स्पर्धेच्या अर्जांना मुदतवाढ
By admin | Published: September 17, 2015 2:57 AM