Join us

‘आपला दवाखाना’चा विस्तार! आणखी ५४ दवाखाने सुरू करणार, 6 पाॅलिक्लिनकही होणार कार्यरत

By स्नेहा मोरे | Published: February 02, 2024 6:28 PM

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेच्या विस्तारासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पनांत २३ कोटींची तरतूद प्रस्तावित आहे.

मुंबई : आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी सुरू केलेल्या ‘आपला दवाखाना’ योजनेला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षात या दवाखान्यांची संख्या २०२ वर पोहोचली होती, यंदा आता पालिकेच्या अर्थसंकल्पनानुसार २०२४-२५ या कालावधीत आणखीन ५४ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. तसेच, सहा अतिरिक्त पाॅलिक्लिनकही कार्यरत होणार आहेत.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेच्या विस्तारासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पनांत २३ कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. या दवाखान्यांमध्ये आगामी काळात फिजिओथेरपिस्ट, कान, नाक घसातज्ज्ञांच्या सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. तसेच, पालिकेच्या पॅनलवरील खासगी डायग्नोस्टिक सेंटरमार्फत विविध चाचण्यांसाठी सेवा व्हाऊचर पद्धतीने अनुदानित दरात उपलब्ध होणार आहेत.

कर्करोग नियंत्रण मॉडेलची स्थापना

‘आरोग्यम् कुटुंबम्’ पालिकेने २०२४-२५ या वर्षात मुख्यमंत्री ‘आरोग्य आपल्या दारी’अंतर्गत सर्वसमावेशक कार्यक्रम नियोजित केला आहे. या योजनेअंतर्गत, मधुमेह, उच्च रक्तदाब, मानसिक आरोग्य आणि मोठ्या प्रमाणात आढळणारे कर्करोग (मुख, स्तन, गर्भाशय) या आजारांची तपासणी करून संशयित रुग्णांना पुढील निदान करण्याकरिता संदर्भ सेवा देणे, वयोवृद्ध, तसेच संवेदनशील नागरिकांची घरी जाऊन रक्त तपासणी करणे व त्यांच्या रोगाच्या पुढील उपचारांचे व्यवस्थापन करणे यांचा समावेश आहे. कर्करोग नियंत्रणाकरिता निदान व सेवांकरिता सार्वजनिक व खासगी क्षेत्रांचा समावेश असेल. प्रायोगिक तत्त्वावर ‘हृदय संजीवनी’ हा प्रकल्प सुरू करण्यात येईल, या माध्यमातून हृदयविकारामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वानुसार निदान व उपचार सेवा देण्यात येईल. या योजनांसाठी पालिकेने अर्थसंकल्पात २०२४-२५ कालावधीसाठी असंसर्गजन्य रोग कार्यक्रमासाठी १२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

टॅग्स :मुंबईहॉस्पिटल