आरोग्यसेवांचे विस्तारीकरण, एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढणार
By संतोष आंधळे | Published: January 1, 2024 12:44 PM2024-01-01T12:44:30+5:302024-01-01T12:45:34+5:30
तज्ज्ञ डॉक्टर निर्माण व्हावेत म्हणून महापालिकेच्या काही रुग्णालयात डीएनबी, डिप्लोमा अभ्यासक्रम चालू करण्यात येणार आहे.
संतोष आंधळे, विशेष प्रतिनिधी -
नवीन वर्ष आरोग्य क्षेत्रासाठी कलाटणी देणारे ठरणार आहे. खासगी रुग्णालयांसोबत, महापालिका आणि शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या बहुतांश रुग्णालयात पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवांचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. त्यासोबत आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापर मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालयात होणार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. तज्ज्ञ डॉक्टर निर्माण व्हावेत म्हणून महापालिकेच्या काही रुग्णालयात डीएनबी, डिप्लोमा अभ्यासक्रम चालू करण्यात येणार आहे.
पाच लाखांचे आरोग्य कवच
शासनाने काही महिन्यांपूर्वी राज्यभरासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू होणार, असे जाहीर केले होते. राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी योजना असून, सर्व अधिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांनाही ती लागू केली गेली आहे. या योजनेंतर्गत उपचारांसाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच देण्यात आले आहे. राज्यातील १००० रुग्णालयांचा यात सहभाग असून, आजाराची संख्या ९९६ वरून १३५६ इतकी केली; मात्र यासाठी विमा देणाऱ्या नवीन कंपनीच्या निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम सुरू असून, ते काम पूर्ण होऊन जानेवारी महिन्यात ही योजना लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई महापालिकेच्या दंत महाविद्यालयात ११ मजल्यांची नवी इमारत उभारण्यात आली आहे. त्यात विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, १०० विद्यार्थी एकाचवेळी बसू शकतील इतके दोन मोठे हॉल, कॅडकॅम अत्याधुनिक लॅबोरेटरी असलेल्या इमारतीचे लोकार्पण जानेवारीत होणार आहे. त्यानंतर आधुनिक दंत उपचार स्वस्त दरात मिळतील.
केईएम रुग्णालयातील चार वॉर्डांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून मार्च महिन्यात या वॉर्डाची दुरुस्ती होणार आहे. उपनगरातील रुग्णालयातही बेडची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यात वांद्रे येथील के.बी. भाभा हॉस्पिटलचे ४९७ बेड्स, मुलुंडच्या अग्रवाल हॉस्पिटलमध्ये ४७०, बोरिवलीच्या भगवती रुग्णालयात ४९० आणि गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात ५८० बेड वाढणार आहेत.
अनेक वर्ष जे. जे. रुग्णालय परिसरात सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे. अंतिमतः त्यातील काही भाग नवीन वर्षात सुरू होणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाने सांगितले आहे. दोन मजली तळघरासह, तळमजला अधिक दहा मजल्याची इमारत असेल. प्रत्येक मजला एक लाख चौरस फुटाचा असणार आहे. ए, बी, सी, डी अशा चार विंग असतील. त्यापैकी दोन विंग नवीन वर्षात कार्यान्वित होतील. सध्या जे. जे. रुग्णालयातील बेड्सची संख्या १३५० इतकी असून रुग्णालय पूर्ण झाल्यावर १००० बेड वाढून एकूण संख्या २,३५० इतकी असेल.
गेल्या ११ वर्षांपासून प्रस्तावित असलेल्या दक्षिण मुंबईतील नवीन वैद्यकीय महाविद्यालयाला अखेर अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. राज्य शासनाचे दक्षिण मुंबईत सर जे. जे. रुग्णालय असून, त्याला संलग्न असे ग्रँट मेडिकल कॉलेज आहे. या रुग्णालयांतर्गत आणखी जी. टी. कामा आणि सेंट जॉर्जेस अशी रुग्णालये आहेत. यापैकी जी. टी. हॉस्पिटलचे मेडिकल कॉलेज सुरू व्हावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या दालनात बैठक घेऊन जी. टी. हे नवीन मेडिकल कॉलेज सुरू करण्याच्या सूचना दिल्या असून नवीन वर्षात हे कॉलेज सुरू होण्याची शक्यता आहे.
सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून काही अभ्यासक्रमासाठी परवानगी मागण्यात आली आहे. येत्या वर्षी एक-दोन कोर्सेस चालू करण्यात येणार आहेत. सोबतच या रुग्णालयात लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये येत्या काळात लिव्हर सेंटर सुरू केले जाणार आहे. कामामध्ये आयव्हीएफ सेंटर तरुण जोडप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वंध्यत्वाचे प्रमाण वाढत आहे. अशांना मूल होण्यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून कृत्रिम गर्भधारणेचे (आयव्हीएफ) उपचार घ्यावे लागतात. या उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात असतो. सामान्यांना हा खर्च परवडत नाही. त्यामुळे शासनाने कामा या महिला आणि मुलाच्या उपचारासाठी स्वतंत्र हॉस्पिटलमध्ये आयव्हीएफ सेंटर येत्या वर्षात सुरू होणार आहे.
जे जे रुग्णालयात २१ क्रमांकाचा वॉर्ड खासगी हॉस्पिटलला लाजवेल अशा कॉर्पोरेट पद्धतीने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर चार ते पाच वॉर्ड अशाच पद्धतीने सुरू करण्यात येणार आहेत. त्यासोबत कोट्यवधी रुपये खर्च करून अत्याधुनिक स्वरूपाची चार मॉड्युलर ऑपरेशन थिएटर चालू करण्यात येणार आहेत. या रुग्णालयाच्या परिसरात अनेक पुरातन इमारती आहेत. त्यासाठी हेरिटेज वॉक सुरू होईल. परदेशातील वास्तू पाहताना ज्या पद्धतीने ऑडिओ फोन दिले जातात, त्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. जे जे रुग्णलयाची १५० वर्ष जुनी इमारत जतन करण्यात येणार असून त्या ठिकाणी वस्तुसंग्रहालय करण्यात येणार आहे.
वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढणार आहे. नवीन वर्षात त्याचे प्रमाण वाढेल. या प्रगत तंत्रज्ञानामुळे रेडिऑलॉजीच्या फिल्म्स वाचणे, त्याच आधारावर रिपोर्ट वाचण्यासाठी टाटा हॉस्पिटलमध्ये काही प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला असून येत्या काळात हा बदल अनेक हॉस्पिटलमध्ये दिसेल.