मुंबई : वाढत्या गर्दीचा विचार करून २४ डब्यांची मेल, एक्स्प्रेस चालविण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. या मागणीचा विचार करून सीएसएमटी स्थानकावरील फलाटांचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरून प्रवाशांना लवकरच २४ डब्यांच्या मेल, एक्स्प्रेसमधून प्रवास करता येणार आहे.सीएसएमटी स्थानकावरील फलाट क्रमांक १०, ११, १२ आणि १३ या फलाटांची लांबी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे येथे २४ डब्यांची मेल, एक्स्प्रेसला थांबा घेता येणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण खर्च ११४ कोटी रुपये आहे. नुकताच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात ४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.गर्दीचे विभाजन करण्यासाठी सीएसएमटी स्थानकावरून २४ डब्यांची मेल, एक्स्प्रेसला थांबा देता यावा, यासाठी फलाटांची लांबी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे देशभरातील प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.प्रवाशांना दिलासा!अनेक कालावधीपासून मांडवी, कोकणकन्या एक्स्प्रेस २४ डब्यांची करण्याची मागणी कोकणवासीयांकडून करण्यात येत होती. मात्र, सीएसएमटी स्थानकावर २४ डब्यांच्या मेल, एक्स्प्रेसला थांबा देण्यासाठी फलाट नसल्याने ही मागणी पूर्ण होत नव्हती. मात्र, आता फलाटांचे विस्तारीकरण केल्यास मांडवी, कोकणकन्यासह अनेक मेल, एक्स्प्रेस २४ डब्यांची करणे शक्य होणार आहे. त्यामुळे एका मेल, एक्स्प्रेसमध्ये जादा प्रवाशांना प्रवास करता येणार असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.
सीएसएमटी स्थानकावरील फलाटांचे होणार विस्तारीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 6:11 AM