लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यामुळे तेथील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. जीव वाचवण्यासाठी देश सोडण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. या कठीण प्रसंगात भारताकडून त्यांना मदतीची अपेक्षा आहे. भविष्यकालीन दृष्टिकोनातून भारतीय राज्यकर्त्यांनी ही परिस्थिती नीट हाताळावी, असे मत ‘सरहद’ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार यांनी व्यक्त केले आहे.
नहार हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अफगाणिस्थानातील नागरिक, भारतीय दूतावासातील अधिकारी आणि स्थानिक पत्रकारांच्या संपर्कात आहेत. सोमवारी रात्रीपर्यंत त्यांचा काही लोकांशी संपर्क झाला. मात्र, आता नेटवर्कअभावी संपर्क होत नसल्याचे त्यांनी सांगितले. कोणालाही तालिबान्यांच्या राजवटीत राहायचे नाही. जीव वाचवण्यासाठी त्यांना इतर देशांचा आश्रय हवा आहे. विशेषतः भारताकडे मदतीच्या अपेक्षेने ते पाहत आहेत, असेही नाहर म्हणाले.
काही भारतीयही अफगाणिस्तानात अडकले आहेत. सरकारी सेवक वगळता इतर भारतीयांची संख्या एक हजारांच्या जवळपास असेल. त्यातील काही लोक कामानिमित्त, तर काही नातेवाइकांच्या भेटीला गेले होते. त्यांना तालिबान्यांपासून सर्वाधिक धोका आहे. सध्या ड्राय फ्रूट्स किंवा अन्य खानपानाचे पदार्थ असले तरी तात्काळ मदतकार्य पोहोचून जीव वाचावा, यासाठी ते धावपळ करीत आहेत. त्यामुळे भारत सरकारने तालिबान्यांविषयी आपले धोरण जाहीर करून या नागरिकांच्या सुटकेसाठीही प्रयत्न करायला हवेत, असे नहार म्हणाले.
भारत केवळ हिंदू आणि शिखांच्या मदतीसाठी प्रयत्नशील असल्याचे संदेश अफगाणी नागरिकांपर्यंत पोहोचल्याने ते प्रचंड तणावाखाली आहेत. नकारात्मक संदेश त्यांच्यापर्यंत गेला आहे. आपण आजची स्थिती नीट हाताळली नाही, तर भविष्यातील संबंधांवर त्याचा विपरीत परिणाम होईल. बहुतांश अफगाणी नागरिक, विशेषतः पख्तुनी लोक भारताच्या बाजूने आहेत. त्यामुळे त्यांना आपण सहकार्य केलेच पाहिजे, असेही नहार म्हणाले.
विद्यार्थी तणावाखाली
भारतात, विशेषतः महाराष्ट्रात बरेच अफगाणी विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यातील काही जणांना सरकार शिष्यवृत्ती देते; परंतु शिष्यवृत्ती नसलेले ४० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी सध्या तणावाखाली आहेत. पालकांकडून येणारी मदत थांबली असून, व्हिसाची मुदत संपत आल्याने त्यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे. यातील बरेच विद्यार्थी सरकारी अधिकाऱ्यांची मुले आहेत आणि तालिबानी त्यांनाच टार्गेट करीत असल्याने विद्यार्थी नकारात्मक मानसिक स्थितीतून जात असल्याचे नहार यांनी सांगितले.