मुंबई - मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा अटल सेतू वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून आतापर्यंत ९ कोटी १ लाख ९० हजार ३८५ रुपये टोलद्वारे प्राप्त झाले आहेत. मात्र या महसुलावर एमएमआरडीएचे समाधान झालेले नाही. कारण तब्बल १७ हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सेतूवरून दिवसाला ७० हजार वाहने प्रवास करतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. प्रत्यक्षात वाहनांची रोजची संख्या अजून ३० ते ३५ हजार म्हणजे निम्मीच आहे. त्यामुळे मिळणारा टोलही अपेक्षेपेक्षा अर्धाच आहे.
अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू १३ जानेवारीला सकाळी ८ वाजेपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अटल सेतू बांधण्यासाठी १७ हजार कोटी रुपये खर्च केला आहे. जायकाकडून यासाठी कर्जरूपाने अर्थसाहाय्य घेण्यात आले आहे. अटल सेतूचा टोल ५००वरून २५० रुपये करण्यात आला आहे. दि. २८ जानेवारीपर्यंतचा टोल पाहिला, तर दि. २३ जानेवारीला सर्वात कमी ३२ लाख ५४ हजार ४९५ टोल मिळाला, तर १४ जानेवारीला सर्वाधिक ९२ लाख ७३ हजार ९९० रुपये टोल मिळाला. या काळात एकाही दिवशी १ कोटीचा महसूल मिळालेला नाही.
२८ जानेवारीपर्यंत ४ लाख ५६ हजार २१४ वाहनांनी प्रवास केला आहे. त्यातून प्राधिकरणाला टोलमधून ९ कोटी १ लाख ९० हजार ३८५ रुपये मिळाले आहेत. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंतच्या टोलदरानुसार येथून प्रवास करणाऱ्या वाहनांना २५० पासून १,५८० रुपये एका बाजूच्या प्रवासासाठी मोजावे लागत आहेत.