अपेक्षा ६ हजार काेटींची, जमा ६३८ कोटी; मनपा पुढे मालमत्ता करातून उत्पन्न गोळा करण्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 09:34 AM2024-01-02T09:34:30+5:302024-01-02T09:34:59+5:30
३१ मार्चपर्यंत महापालिकेला उर्वरित ९० टक्के करसंकलन करण्यासाठी कंबर कसावी लागणार आहे.
मुंबई : आशियातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेपुढे यंदा मालमत्ता करातून संकलित होणाऱ्या महसूलप्राप्तीचे उद्दिष्ट साध्य करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता कराच्या रुपाने सहा हजार कोटी रुपये जमा होणे अपेक्षित असताना, डिसेंबरअखेरपर्यंत केवळ ६३८ कोटी रुपयेच जमा झाले आहेत. ३१ मार्चपर्यंत महापालिकेला उर्वरित ९० टक्के करसंकलन करण्यासाठी कंबर कसावी लागणार आहे.
मालमत्ता कर मुंबई महापालिकेचे उत्पन्नाच्या साधनांपैकी मुख्य स्रोत आहे. दरवर्षी सुमारे पाच ते सहा हजार कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात येतो. ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात जानेवारी, २०२२ पासून माफी देण्यात आल्याने महापालिकेला वर्षाला तब्बल ४०० कोटींवर पाणी सोडावे लागते. त्यात २०१५ पासून मालमत्ता करात वाढ न केल्याने उत्पन्नात मोठी घट झाली आहे.
यंदा पालिकेने ४ हजार ५०० कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्याचे सुधारित उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, डिसेंबरअखेर पालिकेला केवळ ६३८ कोटी मालमत्ता कर वसूल करणे शक्य झाले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरअखेर पालिकेच्या तिजोरीत ३ हजार ५५० कोटी इतका महसूल जमा झाला होता.
३ हजार ८६२ कोटी बाकी:
२०२३-२४ या आर्थिक वर्षात सुमारे अंदाजे ६ हजार कोटींच्या कर वसुलीचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे. मागच्या ९ महिन्यांत मालमत्ता करात नेमकी किती टक्के करवाढ करायची, हे निश्चित झाले नसल्याने पालिकेला देयके पाठविण्यास विलंब झाला. त्यामुळे तात्पुरती देयके पाठविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आणि ऑनलाइन बिले पाठविण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आता पालिकेसमोर अजून या आर्थिक वर्षात ३ हजार ८६२ कोटींचा मालमत्ता कर जमा करण्याचे आव्हान आहे. नाही.