अॅप बेस्ड टॅक्सी संपाचा निकाल आज अपेक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 05:13 AM2018-11-01T05:13:21+5:302018-11-01T07:00:35+5:30
गेले दहा दिवस मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागल्यानंतर, अॅप बेस टॅक्सीच्या संपाबाबत महत्त्वाची बैठक गुरुवारी पार पडणार आहे.
मुंबई : गेले दहा दिवस मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागल्यानंतर, अॅप बेस टॅक्सीच्या संपाबाबत महत्त्वाची बैठक गुरुवारी पार पडणार आहे. प्रतिकिलोमीटर दरवाढीसह मुळ भाडेवाढ, राइड टाइम या आणि मागण्या पूर्ण करण्याबाबत लेखी आश्वासन मिळत नसल्यामुळे अॅप बेस्ड टॅक्सी संप गुरुवारीही कायम असणार आहे.
शहरातील ओला-उबर व्यवस्थापनाच्या गलथान कारभाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या नेतृत्वाखाली सुमारे हजारो अॅप बेस्ड टॅक्सी चालक-मालकांनी २२ आॅक्टोबरपासून संप पुकारला आहे. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ओला-उबर व्यवस्थापनाशी बैठक संपल्यानंतर, संघाचे सरचिटणीस गोविंद मोहिते यांनी सांगितले की, मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच संप मागे घेण्यात येईल. बैठकीत काही मागण्यांच्या पूर्ततेसाठी वरिष्ठांना विचारावे लागेल, अशी भूमिका ओला-उबर प्रतिनिधींनी घेतली. यामुळे गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीनंतर संपाबाबत संघाची भूमिका जाहीर करण्यात येईल. त्यामुळे संपाबाबत आज निकाल अपेक्षित आहे.
तत्पूर्वी, बुधवारी दुपारी काही चालक-मालक यांनी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे संजय नाईक यांनी सांगितले की, ‘ओला-उबर व्यवस्थापन आणि सरकारचे साटेलोटे आहे. यामुळे दहा दिवसांपासून सुरू असलेला संप मिटविण्यासाठी सरकारने कोणतीही हालचाल केलेली नाही. ओला-उबर प्रशासनाला सरकारी पाठबळ असल्याने ते जुमानत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खटाव समितीच्या सूचनांचे पालन करण्याबाबत लवकरच न्यायालयाकडे दाद मागण्यात येईल.