अग्निशमन उपकरणांसाठी ५९ कोटी खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 03:59 AM2018-04-19T03:59:54+5:302018-04-19T03:59:54+5:30
काळबादेवी येथील आगीच्या घटनेनंतर मुंबई पालिका प्रशासनाने, तीन वर्षांत मुंबई अग्निशमन दलातील सहा प्रकारांच्या उपकरणांसाठी तब्बल ५९ कोटी खर्च केले आहेत. माहिती अधिकारन्वये प्राप्त कागदपत्रातून ही माहिती समोर आली आहे.
मुंबई : काळबादेवी येथील आगीच्या घटनेनंतर मुंबई पालिका प्रशासनाने, तीन वर्षांत मुंबई अग्निशमन दलातील सहा प्रकारांच्या उपकरणांसाठी तब्बल ५९ कोटी खर्च केले आहेत. माहिती अधिकारन्वये प्राप्त कागदपत्रातून ही माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी काळबादेवी आगीनंतर, मुंबई अग्निशमन दलाने आगीप्रसंगी ज्या उपकरणांची आवश्यकता असते व जी खरेदी केली आहे, त्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाकडे मागितली होती.
मुंबई अग्निशमन दलाचे विभागीय अग्निशमन अधिकारी एस. डी. सावंत यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत दिलेल्या माहितीनुसार, २२ नग लाइट पोर्टेबल पंप, ३५ एलईडी इमरर्जन्सी लाइट, १७ क्विक रिस्पॉन्स वाहने, ६ आगीचे बंब ५ हाय प्रेशर पंप, तर १४ किलो लीटरचे ११ वॉटर टँकर खरेदी करण्यात आले असून या सर्वांसाठी ५९ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. या खर्चानंतर अग्निशन यंत्रणा अधिक सक्षम होऊन आगीच्या घटना नियंत्रणात आणण्यात मदत होईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.