मुंबई : मुंबईत रस्त्यावर तसेच भूमिगत टेलिफोन, मोबाइल, गॅस, इंटरनेट, केबल सेवा, जलवाहिन्या, मलनिःसारण वाहिन्या यांसह विविध सेवा उपयोगिता कंपन्यांनी आपल्या कामानिमित्त चर खोदल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्यात येत नसल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे चर बुजवून रस्ता पूर्ववत करण्याचे काम स्वत:च करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी सात परिमंडळांतील २४ वॉर्डांमधील चर बुजविण्यासाठी पालिका तब्बल २८० कोटी रुपये खर्च करणार आहे.
दरवर्षी पावसाळ्यात खड्डेमय होणारे रस्ते आणि नव्या रस्त्यांच्या बांधणीवर पालिकेकडून कोटी रुपये खर्च करण्यात येतात. ही कामे करतानाच मोबाइल, गॅस, इंटरनेट अशा विविध सेवा उपयोगिता कंपन्यांनाही त्यांची कामे करण्यास परवानगी देण्यात येते.
चर काढताना नियमांचे पालन नाही :
विविध कंपन्या काम करण्यासाठी रस्ता खोदताना तो कसा आणि किती प्रमाणात खोदला जाईल, यासंबंधीच्या सूचना धोरणात नमूद करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे पादचाऱ्यांना कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही, अशा सूचना पालिकेकडून करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांचे पालन या कंपन्यांकडून होताना दिसत नाही. परिणामी, अनेक ठिकाणी मुंबईकरांना रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे हाल सोसावे लागतात. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून हे चर बुजविले जाणार आहेत.
४० कोटींची तरतूद :
परिमंडळ १ : ए-कुलाबा, बी-सँडहर्स्ट रोड, सी-चंदनवाडी, डी-ग्रँट रोड, ई- भायखळा-परिमंडळ २ : परळ- एफ दक्षिण, माटुंगा-एफ उत्तर, वरळी-जी दक्षिण, दादर-जी उत्तरपरिमंडळ ३ : वांद्रे - एच पूर्व, वांद्रे-एच पश्चिम अंधेरी-के पूर्वपरिमंडळ ४ : अंधेरी-के पश्चिम, गोरेगाव-पी दक्षिण, मालाड- पी उत्तरपरिमंडळ ५ : कुर्ला- एल, चेंबूर-एम पूर्व, चेंबूर-एम पश्चिमपरिमंडळ ६ : घाटकोपर-एन, भांडूप, एस मुलुंड टी परिमंडळ ७ : कांदिवली-आर दक्षिण, बोरिवली-आर उत्तर, दहिसर-आर मध्य
यासाठी खासगी कंपन्या आणि सरकारी यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या या कामांसाठी पालिका संबंधितांकडून पैसे आकारते. कामानंतर रस्त्यावर चर तसेच मोकळे ठेवले जात असल्याने नागरिकांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे आता हे चर बुजविण्यासाठी परिमंडळनिहाय निविदा मागविण्यात आल्या आहेत.