मुंबई : चेंबूर आणि माटुंगा विभागातील पाच पदपथांच्या दुरुस्तीसाठी तब्बल ५१ कोटी रुपये महापालिका प्रशासन खर्च करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे.
मुंबईत १८०० किलोमीटरचे पदपथ आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये बहुतांशी पदपथांवर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी हक्काची जागा उरलेली नाही. विद्यमान आर्थिक वर्षात पदपथ, वाहतूक बेटे, पुलांखालील सौंदर्यीकरण अशा प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात आली आहे. तर पदपथांच्या सुशोभीकरणासाठी तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
असे झाले पदपथाचे सुशोभीकरण....
काळाघोडा येथील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट समोरील पदपथाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. येथे बस थांब्याच्या ठिकाणी दिव्यांगांना व्हीलचेअर पदपथावर घेऊन जाता येईल, अशा पद्धतीने दुरुस्ती करण्यात आली आहे, तर वडाळा ते माटुंगापर्यंतच्या पदपथांची दुरुस्ती व सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
५१ कोटींचा खर्च....
चेंबूर आणि माटुंगा येथील दोन पदपथांच्या दुरुस्तीसह सुशोभीकरणासाठी ३१ कोटी चार लाख रुपये खर्च केले जाणार आहेत, तर कोरेगाव येथील एम.जी. मार्ग, वांद्रे पूर्व येथील आरकेपी व संत ज्ञानेश्वर मंदिर रस्त्यालगतच्या पट्ट्यांची आणि पदपथांच्या दुरुस्तीसाठी १९ कोटी ७० रुपये खर्च केला जाणार आहेत.
या पदपथांचे सुशोभीकरण...
* चेंबूर रेल्वेस्थानक ते डायमंड उद्यानापर्यंतच्या एक किलोमीटर पदपथाचे काँक्रिटीकरण करून सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
* वडाळा संत जोसेफ सर्कल ते माटुंगा रुईया महाविद्यालयापर्यंत सुमारे दोन किलोमीटर लांबीचा पदपथ बेसॉल्ट दगडाचा आहे. पदपथाची दुरुस्ती व काँक्रिटीकरण.
* गोरेगाव येथील एम.जी. मार्गाचे पदपथ पेव्हर ब्लॉकचे आहेत. तिथे सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार आहे.