मुंबई : कुर्ला येथील दोन नाल्यांतील मैला मिठी नदीत जाण्यापासून रोखण्यासाठी ६.७ किलोमीटर बोगदा तयार करण्यात येणार आहे. या बोगद्यातून हा मैला धारावीतील प्रक्रिया केंद्राकडे वळविण्यात येणार आहे. या बोगद्यासाठी महापालिका ४३७ कोटी रुपये खर्च करणार आहे. तर सर्व करांसह हा खर्च ६०४ कोटी रुपयांवर पोहोचणार आहे.
मिठी नदीत मैलापाण्याचा प्रवाह येत आहे. त्यामुळे हरित लवादाने मिठीचे शुद्धीकरण करण्याबरोबरच या नदीत येणारा मैला, सांडपाणी रोखण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते. मिठी नदीत मिळणाऱ्या कुर्ला येथील सफेद पूल आणि बापट नाल्यातील मलजल ६.७ किलोमीटरच्या बोगद्यातून हा मैला धारावी येथील मलजल प्रक्रिया केंद्रात आणण्यात येणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने हिरवा कंदील दाखविला आहे.
यामुळे वाढला प्रकल्पाचा खर्च
जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड आणि मे. मिशीगन इजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांना हे काम देण्यात येणार आहे. पालिकेने अंदाजपत्र बनवल्यानंतर तब्बल ११ महिन्यांनी निविदा प्राप्त झाल्या. त्यामुळे पालिकेने अंदाजपत्रकातील खर्चात वाढ केली. त्या वाढीव खर्चानुसार हे काम देण्यात आले आहे.
* स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कार्यादेश दिल्यानंतर ४८ महिन्यांत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.
* जमिनीच्या २५ मीटर खालून बोगदा तयार करण्यात येणार आहे.
* शाफ्टचा अंतर्गत व्यास - दहा मीटर एवढे असणार आहे.
*२०५० पर्यंतची गरज ओळखून दिवसाला १६८ दशलक्ष लीटर मैलापाणी वाहून नेण्याची क्षमता असलेले हे बोगदे असणार आहेत.