‘मिठी’साठी ८९.६६ कोटी खर्च अपेक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 03:45 AM2021-03-30T03:45:16+5:302021-03-30T03:47:45+5:30
मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगर या तिन्ही भागातून वाहणाऱ्या २० किमी लांबीच्या मिठी नदीच्या सफाई कामांबाबत कार्यादेश देण्यास नुकतीच मंजुरी देण्यात आली. यासाठी ८९.६६ कोटी खर्च अपेक्षित आहे.
- सचिन लुंगसे
मुंबई : मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगर या तिन्ही भागातून वाहणाऱ्या २० किमी लांबीच्या मिठी नदीच्या सफाई कामांबाबत कार्यादेश देण्यास नुकतीच मंजुरी देण्यात आली. यासाठी ८९.६६ कोटी खर्च अपेक्षित आहे.
मिठी नदीची ८० टक्के साफसफाई पावसाळ्यापूर्वी व उर्वरित २० टक्के पावसाळ्यानंतर करण्याचे प्रस्तावित आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या नालेसफाई कामांसाठी १५२.२५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक वेगाने व्हावा, यासाठी सातत्याने उपाययोजना अंमलात आणल्या जातात. याचअंतर्गत मिठी नदीसह मोठ्या नाल्यांची साफसफाई करण्यात येते. मिठी स्वच्छ, साफ आणि सुंदर करण्यासाठी प्रयोग केले जात असतानाच आता मिठी नदीच्या बायो फायटो रेमेडीएशन प्रकल्पाचा काही महिन्यांपूर्वी शुभारंभ करण्यात आला आहे. एमएमआरडीएने मिठी नदी स्वच्छता उपक्रमासह नदीचे सौंदर्यविषयक काम वाढविण्यासाठी टप्प्याटप्प्याने सुंदर प्रकल्प विकसित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये पाण्याची गुणवत्ता सुधारणे, फ्लोटिंग कचरा नदीत प्रवेश होण्यापासून रोखणे हे प्राथमिक लक्ष्य असेल. त्याबरोबरच, रिव्हरफ्रंटच्या सुशोभिकरणाच्या दिशेनेही एमएमआरडीए कार्य करत असून, या प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण झाले आहे. मिठी नदीचे खोलीकरण, रुंदीकरण, खडक खोदाई, संरक्षक भिंत, सर्व्हिस रोड, सुशोभीकरणाची कामे या कामांपैकी बहुतांश कामे होत आहेत.
मुंबईतल्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेगाने काम केले जात असून, मिठी नदीच्या कामासही वेग आला आहे. आजमितीस रुंदीकरण आणि खोलीकरणाचे काम ९५ टक्के आणि मिठी नदीची संरक्षक भिंत बांधण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे मिठी नदीच्या धारण क्षमतेमध्ये दुपटीने आणि वहन क्षमतेमध्ये तीन पटीने वाढ झाली आहे.
मिठी अशी होणार सुंदर
पर्यावरणपूरक जैविक अभियांत्रिकीचे उपाय म्हणजे नदी तट सुशोभीकरण करणे होय.
शाश्वत वृक्षारोपण केले जाईल. यात स्थानिक वनस्पतींचा समावेश केला जाईल. जैव अभियांत्रिकी तंत्रज्ञानाद्वारे दूषित नदी स्वच्छ केली जाईल.
दुर्गंधमुक्त वातावरण निर्माण केले जाईल. माती आणि पाण्यातील विषारी, हानिकारक पदार्थांचा नाश करण्यासाठी सजीव हिरव्या वनस्पतींचा वापर केला जाईल.
मिठी नदीच्या विकासाचा आराखडा तयार असून, त्याची चार पॅकेजमध्ये अंमलबजावणी केली जाईल. यात पवई येथील फिल्टर पाड्यापासून बांधकाम करणे, मलनि:सारण वाहिनी, सर्व्हिस रोड बांधकाम, ८ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या मलजल प्रक्रियेचे बांधकाम याचा समावेश आहे. मिठी नदीच्या कामासह येथे पर्यटन आणि कृत्रिम तलावाचे काम करण्यात येईल. त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येईल.