धोकायदायक पुलांच्या दुरुस्तीसाठी महागडा ‘सल्ला’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 04:18 AM2018-11-07T04:18:15+5:302018-11-07T04:18:33+5:30

महाड पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील पुलांचे आॅडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले हे पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाले.

Expensive 'advice' for repair of bridges | धोकायदायक पुलांच्या दुरुस्तीसाठी महागडा ‘सल्ला’

धोकायदायक पुलांच्या दुरुस्तीसाठी महागडा ‘सल्ला’

Next

मुंबई - महाड पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील पुलांचे आॅडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले हे पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाले. मात्र, लोअर परळ येथील डिलाइल रोड पुलाच्या दुरुस्तीतील सावळ्या गोंधळामुळे पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा पेटला. त्यामुळे धोकादायक पुलांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी महापालिकेने तीन सल्लागारांची निवड केली आहे. या सल्लागारांसाठी महापालिका सात कोटी ७३ लाख रुपये मोजणार आहे.
आॅगस्ट, २०१६ मध्ये महाड येथे सावित्री नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या घटनेने मुंबईतील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला होता. त्यामुळे मुंबईतील सर्व पुलांचे तातडीने स्ट्रक्टरल आॅडिट सुरू करण्यात आले. त्यानुसार, मुंबईतील सर्व पूल ‘ब्रिज मॅनेजमेंट सीस्टम’द्वारे सुरक्षित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. गेली दोन वर्षे या पुलांच्या आॅडिटचा अहवाल गुलदस्त्यातच होता. ४ जुलै रोजी अंधेरी येथे रेल्वेवरील पादचारी पूल कोसळण्याच्या घटनेने धोकादायक पूल आणि त्यावरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला.

मोठ्या दुर्घटनेनंतरही सुरू असलेल्या संथ कारभाराचे तीव्र पडसाद उमटताच, अखेर दोन वर्षांनतर महापालिका प्रशासनाला जाग आली. पालिकेच्या अहवालानुसार मुंबईतील ३०४ पुलांपैकी ११४ पूल चांगल्या स्थितीत आहेत, तर १११ पुलांची किरकोळ दुरुस्ती होणे आवश्यक आहे, परंतु मुंबईतील ६१ पुलांच्या मोठ्या दुरुस्तीचे काम महापालिकेला लवकरच येत्या काही वर्षांमध्ये हाती घ्यावे लागणार आहे, तर १८ पुलांच्या पुनर्बांधणीची तातडीने गरज असल्याचे या आॅडिटमधून समोर आले आहे.

घाटकोपर-मानखुर्द जोड रस्त्यावर शिवाजीनगर जंक्शन, बैंगणवाडी जंक्शन उड्डाणपुलांचे बांधकाम, मिठी नदीवरील आणि नाहूर रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे पुलाचे रुंदीकरण केले जाणार आहे.

या पुलांच्या दुरुस्तीची मागणी

अंधेरी पूल दुर्घटनेनंतर ग्रँटरोड येथील फेरेर पुलालाही तडे गेले होते. महापालिका, रेल्वे आणि आयआयटी मुंबई या संस्थेमार्फत करण्यात आलेल्या पाहणीत ग्रँटरोड येथील फेरेर उड्डाणपूल, मुंबई सेंट्रलचा बेलासिस उड्डाणपूल, दादरचा टिळक उड्डाण पूल, प्रभादेवीचा करोल पूल आणि महालक्ष्मी पुलाच्या दुरुस्तीची शिफारस करण्यात आली आहे.

या पुलांची प्राधान्याने तपासणी

पुलांची संरचनात्मक तपासणी करताना जे पूल सर्वात जुने आहेत, त्यांच्या संरचनात्मक तपासणीला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. उदा. लोकमान्य टिळक पूल, एल्फिन्स्टन पूल इत्यादी.

अशी होणार पुलांची दुरुस्ती

महापालिकेच्या अखत्यारितील पुलांची संरचनात्मक तपासणी दोन वर्षांपासून सुरू होती. त्यानुसार, चांगल्या स्थितीतील पूल, किरकोळ दुरुस्ती आणि मोठी दुरुस्ती, पुनर्बांधणी अशी पुलांची वर्गवारी करण्यात आली आहे. पुढील काही वर्षांत तातडीने दुरुस्तीची गरज नसलेले पूल म्हणजे चांगले पूल, किरकोळ दुरुस्ती म्हणजे पुलांवरील गळती रोखणे अशी छोटी कामे, तर पुलाला धोका निर्माण करणाºया दुरुस्त्या करण्यात येणार आहेत. मात्र, धोकादायक व पडण्याच्या स्थितीत असलेल्या पुलांची दुरुस्ती तत्काळ होणार आहे. हँकॉक पूल आणि कर्नाक बंदर पुलाची दुरुस्ती करण्यात येत आहे.

Web Title: Expensive 'advice' for repair of bridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई