महागडी वाहने चोरणारा गजाआड
By admin | Published: March 15, 2016 12:46 AM2016-03-15T00:46:47+5:302016-03-15T00:46:47+5:30
रस्त्याकडेला पार्क केलेल्या वाहनांच्या बनावट चाव्या वापरून तसेच कॉम्प्युटर लॉक सिस्टीमच्या वाहनांचे डीकोडिंग करून ही वाहने चोरणाऱ्या आणि परराज्यात विकणाऱ्या सराईत चोरांना गुन्हे
मुंबई : रस्त्याकडेला पार्क केलेल्या वाहनांच्या बनावट चाव्या वापरून तसेच कॉम्प्युटर लॉक सिस्टीमच्या वाहनांचे डीकोडिंग करून ही वाहने चोरणाऱ्या आणि परराज्यात विकणाऱ्या सराईत चोरांना गुन्हे शाखेच्या मोटार वाहन चोरीविरोधी पथकाने अटक केली आहे. अयूब अली मासूम अली शेख असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्याकडून ८ महागडी वाहने जप्त करण्यात आली आहेत.
मुंबईत १ जानेवारी ते ६ मार्चपर्यंत तब्बल ५७२ वाहनांची चोरी झाल्याची नोंद पोलिसांकडे आहे. त्यापैकी अवघ्या १०५ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. शहरातील वाढत्या मोटार वाहनचोऱ्यांमुळे मुंबईकरांच्या नाकीनऊ आले आहेत. त्यासाठी मोटार वाहन चोरीविरोधी पथक चोरांच्या मागावर होते. या गुन्ह्यांचा अधिक तपास करत असताना शेख हा सराईत मोटार चोर जोगेश्वरी येथे राहत असल्याची माहिती गुप्त माहितीदारांमार्फत पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून मोटार वाहनचोरीविरोधी पथकाने त्याला अटक केली. त्याच्याकडून ५१ लाख रुपयांची ८ महागडी वाहने, ८१ मोटार वाहनांच्या बनावट चाव्या, पक्कड, हातोडी, स्क्रू ड्रायव्हर, कटर, पंचिंग रॉडसह एसी मशिन हस्तगत केली आहेत.
शेख हा अभिलेखावरील आरोपी असून तो रस्त्याकडेला पार्क केलेल्या वाहनांच्या दरवाजाचे लॉक पकडीने खेचून त्याची बनावट चावी बनवत असे. कॉम्प्युटर लॉक सिस्टीमच्या वाहनांचे डीकोडिंग करून ती चोरी करून परदेशात विक्री करत असे. त्याने अशा प्रकारे मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यातील वाहने त्याने चोरल्याचे चौकशीत समोर आले. या प्रकरणी त्यांच्याकडे अधिक तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेने
दिली. (प्रतिनिधी)