मुंबई : वांद्रे-वरळी सागरी सेतूवर दोन मित्रांच्या मर्सिडीज, बीएमडब्यूच्या रेसिंगमुळे अपघात होत तीन वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघातामुळे वाहतूक एक तास खोळंबली होती. त्यात दोन रुग्णवाहिकाही होत्या.
रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास खांब क्रमांक १९ जवळ अपघात झाला. याप्रकरणी वरळी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करत मर्सिडीज चालक शाहबाज खान (वय ३१) व बीएमडब्ल्यू चालक तारीख चौधरी (२९) यांना अटक केली आहे.
खासगी टॅक्सीचालक निसार अहमद (२६) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमद हे एका कुटुंबाला वांद्रे येथे घेऊन जात होते.
निसार यांच्यासोबत टॅक्सीमध्ये पती-पत्नी, त्यांचा १० वर्षाचा मुलगा व वयोवृद्ध महिला प्रवास करत होते. निसार यांची टॅक्सी रस्त्याच्या डाव्या बाजूने जात असताना मागून भरधाव वेगाने मर्सिडीज व बीएमडब्यू आल्या. त्या टॅक्सीच्या शेजारी आल्या असताना दोन्ही गाड्या एकमेकांना धडकून त्यांनी अहमद यांच्या टॅक्सीलाही धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, एक खासगी टॅक्सी पलटी होऊन दुभाजकाला धडकली.
वेगाची स्पर्धा करताना अपघात
खान व चौधरी दोघेही चांगले मित्र आहेत. त्यातील खान हा मुंबई सेंट्रल व चौधरी हा कुर्ला येथील रहिवासी आहे. पहाटे दोघेही वांद्रे येथून कारने कोस्टल रोडने दक्षिण मुंबईत गेले. कोस्टल रोडवरून सागरी सेतूवरून ते वांद्रेच्या दिशेने एकमेकांमध्ये वेगाची स्पर्धा करत जात असताना हा अपघात झाल्याचा अंदाज असून पोलिस अधिक तपास करत आहे. खान हा मेटल ट्रेडिंग कंपनीमध्ये, तर चौधरी हा औषधांच्या कंपनीत कामाला आहे. मर्सिडीज व बीएमडब्ल्यू कंपनीच्या नावावर आहे.