भांडीवालीकडून जुन्याच्या बदल्यात नव्या दागिन्यांचे एक्सचेंज महागात! चार महिलांना लाखोंचा फटका
By गौरी टेंबकर | Published: January 27, 2024 04:47 PM2024-01-27T16:47:16+5:302024-01-27T16:47:57+5:30
वांद्रे परिसरात जुन्या दागिन्यांच्या बदल्यात नवे दागिने मिळवून देते, असे सांगत एका भांड्यावालीने चार महिलांना लाखो रुपयांचा चुना लावला आहे.
मुंबई: जुन्या कपड्याच्या बदल्यात नवीन भांडी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी घेतली असतील. मात्र वांद्रे परिसरात जुन्या दागिन्यांच्या बदल्यात नवे दागिने मिळवून देते, असे सांगत एका भांड्यावालीने चार महिलांना लाखो रुपयांचा चुना लावला आहे. या विरोधात त्यांनी खेरवाडी पोलिसात धाव घेत अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. तिचा शोध पोलीस घेत आहेत.
वांद्रे पूर्वच्या संत ज्ञानेश्वर नगरमध्ये हा प्रकार घडला. तक्रारदार चंदा जैस्वाल (३७) या त्यांच्या शेजारच्या अन्य तीन महिलांसोबत गप्पा मारत बसल्या होत्या. त्यावेळी त्यांना ४५ वर्षाची भांडीवाली महिला त्याठिकाणी जुनी भांडी देऊन नवीन भांडी देत असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी तिला आवाज देत स्वतःकडे बोलावले आणि काही जुनी भांडी देऊन तिच्याकडून नवीन भांडी घेतली.
सदर महिलेने चंदासह अन्य महिलांच्या अंगावर असलेले दागिने पाहत तुम्ही तुमच्या गळ्यातले आणि कानातले दागिने काढा आणि एका कपड्यात ठेवा. मी त्या दागिन्यांच्या बदल्यात नवे दागिने मिळतील का असे माझ्या मालकांना विचारून येते असे त्यांना म्हणाली. तिच्यावर विश्वास ठेवत या चारही महिलांनी स्वतःचे दागिने काढून एका रुमालात ठेवत तिच्याकडे दिले. ती महिला ४ वाजेपर्यंत परत येते असे सांगून त्या ठिकाणाहून निघून गेली. त्यावेळी त्या महिलेने त्यांचे दागिनेही नेल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि संध्याकाळपर्यंत तक्रारदाराने तिची वाट पाहिली. मात्र ती परतलीच नाही तेव्हा दागिने चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
अखेर पतीला घाबरून त्यांनी त्या दिवशी हा प्रकार कोणाला सांगितला नाही. मात्र दुसऱ्या दिवशी घडला प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यावर खेरवाडी पोलिसात तक्रार दिली गेली. त्यांचे जवळपास ९७ हजार रुपये किमतीचे दागिने भामट्या महिलेने पळवून नेले.