लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इन्स्टाग्रामवरील अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे अंधेरीच्या तरुणीला महागात पडले. मैत्रीनंतर परदेशी मित्राने गिफ्ट पाठविण्याच्या नावाखाली तरुणीची तीन लाख ९५ हजार रुपयांना फसवणूक केली आहे. याप्रकरणी अंधेरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
अंधेरी परिसरात तक्रारदार तरुणी कुटुंबीयासोबत राहते. ३ जानेवारी रोजी इन्स्टाग्रामवर तिला अनोळखी तरुणाची रिक्वेस्ट आली. तिने ती स्वीकारताच दोघांमध्ये संवाद वाढत मैत्री झाली. यातच ठगाने त्याचे नाव अलेक्झांडर मार्टिन असल्याचे सांगून तो लंडन येथील एका कंपनीत नोकरीला असल्याचे सांगितले. तरुणीचा त्याच्यावर विश्वास बसताच त्याने गिफ्ट पाठवत असल्याचे सांगितले. यात, गोल्ड रिस्ट वॉच, ड्रेस, शूज, परफ्युम, पर्स, गोल्ड नेकलेस, लॅपटाॅप, आय फोन, चॉकलेट व ८५००० पाउंड इत्यादी वस्तू पाठविल्या असल्याचे सांगितले. ११ जानेवारीला गिफ्ट पाठविल्याचे सांगत, फक्त लोकल चार्जेस म्हणून ४५ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यापाठोपाठ दिल्ली कस्टम विभागातून बोलत असल्याचे सांगून गिफ्टसाठी ४५ हजार रुपये भरण्यास सांगितले. तरुणीचा त्यावर विश्वास बसताच तिने पैसे भरले. अशाच प्रकारे वेगवेगळी कारणे पुढे करत तरुणीची तीन लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.