गौरी टेंबकर, मुंबई: कारचा काचेवर टक टक करत एका स्टील व्यवसायिकाचा ९० हजार रुपये किमतीचा आयफोन लंपास करण्यात आला. हा प्रकार गोरेगावला वनराई पोलिसांच्या हद्दीत घडला असून याविरोधात अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार राहुल टेकरीवाल (४१) हे ११ जानेवारी रोजी संध्याकाळी ललित हॉटेल मधून काम संपवून त्यांच्या गाडीने गोरेगाव येथील राहत्या घरी निघाले होते. दरम्यान आरे चेक नाका परिसरात सिग्नल लागल्याने ते थांबले. ते गाडीत असताना डाव्या बाजूला एक अनोळखी इसम पायी चालत आला आणि त्याने गाडीच्या काचेवर हाताने मारायला सुरुवात केली. टेकरीवालानी काच खाली करून काय झाले असे विचारले. तेव्हा त्याने गाडी कैसे चला रहे हो समजता नही क्या मेरे को गाडी लगा असे म्हटले.
त्यानंतर उजव्या बाजूनेही दुसऱ्या व्यक्तीने येऊन तेच सांगितल्याने टेकरीवाल यांनी त्यांची गाडी पुढे घेतली. त्यावेळी ते दोन्ही इसम आणि सीटवर ठेवलेला त्यांचा आयफोन हे गायब झाले होते. तक्रारदाराने आसपास फोनचा शोध घेतला मात्र तो कुठेच सापडला नाही आणि सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. या विरोधात त्यांनी वनराई पोलिसात तक्रार दिल्यावर अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.