परदेशातून येणाऱ्या नागरिकांना महागड्या कॉरन्टाईनचा फटका, आगीतून फुफाट्यात सापडल्याची प्रवाशांची भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 05:47 PM2020-06-13T17:47:33+5:302020-06-13T17:48:04+5:30
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यानंतर त्यांना कॉरन्टाईन केले जाते त्यासाठी आकारल्या जाणाऱ्या दरावरुन प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
खलील गिरकर
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव जगात अनेक ठिकाणी झाल्याने परदेशातून मोठ्या संख्येने भारतीय नागरिक भारतात, महाराष्ट्रात परतत आहेत. वंदे भारत मिशन द्वारे चालवण्यात येणाऱ्या विशेष विमानाने हे प्रवासी परतत आहेत. मात्र मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यानंतर त्यांना कॉरन्टाईन केले जाते त्यासाठी आकारल्या जाणाऱ्या दरावरुन प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या रोजगार धोक्यात आलेले आहेत. विदेशात राहणाऱ्या अनेक भारतीय नागरिकांना दोन तीन महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. मात्र कोरोना जगभरात पसरलेला असल्याने मायदेशी परतण्याच्या ओढीने हे नागरिक भारतात परतले आहेत. मात्र मुंबई विमानतळावर उतरल्यावर त्यांना भारतीय सीम कार्ड घेण्याची सक्ती केली जाते व त्यासाठी तब्बल 500 रुपये उकळले जातात अशी तक्रार करण्यात आली आहे. मुंबईत संस्थांत्मक कॉरन्टाईन करण्यासाठी त्यांना उपलब्ध करुन देण्यात आलेले हॉटेल किंवा इतर ठिकाणी एक दिवस रात्र साठी तब्बल तीन हजार रुपये आकारले जातात त्यातच एवढे पैसे देऊन पुरवल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा फारसा चांगला नाही, अशा तक्रारी पुढे आल्या आहेत.
मालदीव्ह येथे हॉटेलमध्ये कामाला असलेल्या सँल्वादार लोबो या तरुणाला दोन महिन्याचे वेतन मिळालेले नाही. एक महिन्याचे वेतन कंपनी ने आपल्याकडे ठेवून घेतले व त्यामधून विमानाचे तिकीट काढण्यात आले. मुंबईत आल्यावर त्याला विमानतळाजवळील ट्रान्स्झिट मध्ये ठेवण्यात आले व त्यासाठी सात दिवसांच्या वास्तव्यासाठी 21 हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. सरकारी कॉरन्टाईन सुविधेबाबत विचारल्यावर ही सुविधा उपलब्ध नसून याच ठिकाणी राहावे लागेल असे स्पष्ट करण्यात आले. कोरोनाच्या संकटात नोकरी धोक्यात आलेली असून वेतन कपात करण्यात आलेली आहे असे असताना भारतात, मुंबईत मायदेशी परतल्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च होऊ लागल्याने पुढील काळात घरखर्च कसा भागवायचा असा यक्षप्रश्न लोबो सारख्या तरुणांसमोर उभा ठाकला आहे.