मुंबई : बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकड़ून कठोर पावले उचलत कारवाईचा वेग वाढत आहे. यामध्ये, विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्या विरोधातही कारवाईचा वेग वाढत असतानाच, आता मुंबईपोलिसांकडून प्रत्येक बुधवारी ‘नो हॉंर्किंग डे’ म्हणून जाहीर केले. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्याविरोधात विशेष मोहीम राबवत कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी विना हेल्मेट प्रवास करणाऱ्यांसह विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा देताच वाहतूक पोलिसांकड़ून कारवाईचा वेग वाढवण्यात आला आहे. दिवसाला ५०० हून अधिकजणांवर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यापासून शनिवारचे दोन तास नो हॉंर्किंग म्हणत, कारवाई करण्यात आली. त्यापाठोपाठ आता प्रत्येक बुधवार हा ‘नो हॉंर्किंग डे’ म्हणून पोलिसांकडून जाहीर करण्यात आला आहे.
या दिवशी मुंबईतील सर्व वाहतूक विभागांतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांच्या वाहतूक विभागाच्या हद्दीत या दिवसाचे आयोजन करतील. या अंतर्गत नो हॉंर्किंगचे फलक बनवून सिग्नलवर थांबलेल्या वाहनचालकांना दाखविण्यात येतील. नो हॉंर्किंगबाबत माईकवरून वाहनचालकांचे मार्गदर्शन व समुपदेशन करणार आहे. तसेच, विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्या विरोधात मोठ्या प्रमाणात चलन कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
चौकीत बसवून दिले जाणार नियमांचे ज्ञान
विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्याला दंडाबरोबरच मुंबई पोलिसांच्या वाहतूक चौकीत दोन ते तीन तास बसवून वाहतूक नियमांचे ज्ञान दिले जाईल. त्याने ते योग्यरीत्या ऐकले की, नाही यासाठी त्याची परीक्षाही घेण्यात येणार असल्याचे यापूर्वीच आयुक्तांनी सांगितले होते. त्यानुसार, वाहतूक पोलिसांकडून कारवाईही करण्यात येत आहे.
...तर येथे करा तक्रार
हॉंर्किंगबाबत कुठलीही तक्रार असल्यास थेट वाहतूक नियंत्रण कक्षातील ८४५४९९९९९९ या हेल्प लाईनवर संपर्क साधण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.