कठोर निर्बंधांमुळे महागला यूएईचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:06 AM2021-04-25T04:06:21+5:302021-04-25T04:06:21+5:30
तिकिटांत भरमसाट वाढ लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीने संयुक्त अरब अमिरातने (यूएई) २५ एप्रिलपासून भारतीय ...
तिकिटांत भरमसाट वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीने संयुक्त अरब अमिरातने (यूएई) २५ एप्रिलपासून भारतीय विमानांवर बंदी घातली आहे. त्यामुळे रविवारपूर्वी यूएईत पोहोचण्यासाठी प्रवाशांनी धावपळ सुरू केल्याने ही संधी साधत विमान कंपन्यांनी तिकिटांत भरमसाट वाढ केली. शनिवारी यूएईचे तिकीट ४६ हजार ते एक लाख रुपयापर्यंत विकले गेले.
यूएईतील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाल्याने गेल्या काही दिवसांत भारतातून यूएईला जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अनेकांनी तर भारतातील कोरोना संसर्ग कमी होईपर्यंत तेथेच वास्तव्य करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, भारतीयांचे लोंढेच्या लोंढे येऊ लागल्याने सतर्क झालेल्या यूएई प्रशासनाने २५ एप्रिलपासून पुढील १० दिवस भारतीय विमानांना बंदी घातली आहे. त्यामुळे रविवारपूर्वी तेथे पोहोचण्यासाठी बऱ्याचजणांनी धडपड सुरू केली. ही बाब लक्षात घेऊन शनिवारी विमान कंपन्यांनी यूएईला जाणाऱ्या विमान तिकिटांच्या दरांत अव्वाच्या सव्वा वाढ केली. एरवी ८ ते १० हजार रुपयांत मिळणारी तिकिटे २४ एप्रिल रोजी ४६ हजार ते एक लाखांपर्यंत विकली गेली.
* गेल्या आठवड्यात ३०० विमान फेऱ्या
यूएईला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे देशातील मोठ्या विमानतळांवरून अतिरिक्त विमाने सोडण्यात आली. गेल्या आठवड्यात भारत-यूएईदरम्यान ३०० विमान फेऱ्या झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. परदेशातून यूएईमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला कोरोना चाचणीचा अहवाल सादर करणे बंधनकारक असून, १४ दिवस विलगीकरणात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
-----------------------