Join us

कोल्हापूरचे सौदर्य अनुभवले

By admin | Published: August 21, 2014 12:21 AM

रसिकांचा प्रतिसाद : ‘लोकमत उमंग’ चे आयोजन ; छायाचित्र प्रदर्शनाचा समारोप

कोल्हापूर : रसिकांच्या अलोट गर्दीत ‘लोकमत उमंग’ अंतर्गत आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचा आज, बुधवारी समारोप झाला. या प्रदर्शनामुळे कोल्हापूरचे सौंदर्य आणि येथील जैव-विविधतेचे महत्त्व अनुभवायला मिळाले, अशी प्रतिक्रिया रसिकांनी दिली व छायाचित्र खरेदीतून ‘लोकमत’च्या सामाजिक उपक्रमाला हातभार लावला. जागतिक छायाचित्रण दिन व ‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीचा १० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून लोकमत उमंग अंतर्गत छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेत जिल्ह्यातील हौशी व व्यावसायिक छायाचित्रकारांनी दीडशेच्यावर छायाचित्रे पाठविली होती. या सर्व छायाचित्रांचे प्रदर्शन शाहू स्मारक भवनच्या कलादालनात सुरू होते. या छायाचित्रांच्या माध्यमातून रसिकांना ग्रामीण जीवनशैली, न्यू पॅलेस, रंकाळा, पन्हाळा, पश्चिम घाट, प्राणी-पक्षी, माकडांची आढावा बैठक, महालक्ष्मी मंदिर, पक्ष्यांचे घरटे, कावळ्याच्या घरट्यात विसावलेली कोकीळ, पंचगंगा घाट, ब्रह्मपुरीचा दीपोत्सव, शिल्प वैभव, डोंगराळ भागांतून वाहणारे लहान-मोठे धबधबे, वनराई, पाऊलवाट, शेतकऱ्यांनी फुलविलेली शेती, ऊन-पावसाचा खेळ, मावळतीला आलेल्या सूर्याची धरणीवर पसरलेली लाल किरणे, धुके अशा निसर्गाच्या आणि जैव-विविधतेच्या छटा पाहायला मिळाल्या. ेदोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रदर्शन पाहण्यासाठी सकाळी साडेआठ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत रसिकांचा ओघ कायम होता. संध्याकाळच्या सत्रात रसिकांची अलोट गर्दी झाली. यावेळी रसिकांनी छायाचित्रे खरेदी करून ‘लोकमत’च्या सामाजिक कार्याला हातभार लावला. तसेच ‘लोकमत’चा हा उपक्रम अतिशय स्तूत्य असून यापुढेही हे कार्य असेच सुरू राहावे, अशा शुभेच्छा दिल्या. छायाचित्र विक्रीतून मिळालेली ही रक्कम स्वयंम स्कूलला देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनच्या कलादालनात मंगळवारी व बुधवारी ‘लोकमत उमंग’ अंतर्गत छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.