बालनाट्य ‘परिपक्व’ झाल्याची अनुभूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 01:04 AM2018-06-15T01:04:05+5:302018-06-15T01:04:05+5:30
कार्टून्स, चेटकीण, जंगल हेच काय ते मुलांचं भावविश्व.. आजवर याच मानसिकतेतून बालरंगभूमीवर नाटकांचा भडिमार झाला... आणि आजही होतो आहे... पण बालनाट्य यापलीकडेदेखील असू शकते आणि तरुण मंडळीसुद्धा ते उत्तम प्रकारे साकार करू शकतात याची प्रचिती देत नाट्य संमेलनात सादर झालेल्या अप्रतिम आविष्कारांनी बालनाट्य ‘परिपक्व’ झाल्याची अनुभूती दिली.
- नम्रता फडणीस
मुंबई - कार्टून्स, चेटकीण, जंगल हेच काय ते मुलांचं भावविश्व.. आजवर याच मानसिकतेतून बालरंगभूमीवर नाटकांचा भडिमार झाला... आणि आजही होतो आहे... पण बालनाट्य यापलीकडेदेखील असू शकते आणि तरुण मंडळीसुद्धा ते उत्तम प्रकारे साकार करू शकतात याची प्रचिती देत नाट्य संमेलनात सादर झालेल्या अप्रतिम आविष्कारांनी बालनाट्य ‘परिपक्व’ झाल्याची अनुभूती दिली. मुलांच्या भावविश्वाबरोबरच आशयाशी एकरूप झालेल्या कलाकारांच्या अभिनयाने सुंदर कलाविष्कारांचे दर्शन घडविले. कोण म्हणतं बालनाट्याकडे प्रेक्षक फिरकत नाहीत.. सकाळी १०च्या नाटकाला झालेल्या गर्दीने हा समजही खोटा ठरविला.
नाट्य संमेलनातील दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या पर्वाची नांदी ‘तेलेजू’ आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर निर्मित ग्रीप्स थिएटरच्या ‘जंबा बंबा बू’ या दोन बालनाट्यांनी झाली. कोवळं वय.. बागडण्याचे ते मोरपंखी दिवस.. मात्र लहान वयातच ‘कुमारीदेवी’पदी आरूढ केल्याने तिच्या इच्छा-आकांक्षा, खेळण्याच्या वयावरच बंधने आणली जातात.. छोट्या निरागस वयाच्या मुलीचा ‘मालतीदेवी’ होण्यापर्यंतचा हा प्रवास ‘तेलेजू’ या बालनाट्यातून उलगडण्यात आला. अभ्यास आणि भक्तांना दर्शन देणे एवढेच तिचे आयुष्य बनते. तिचा बालसुलभ आनंद ‘तेलेजू’ झाल्याने हिरावून घेतला जातो. आई, बाबा, बहीण यांपासून दुरावलेल्या त्या कुमारीदेवीचे आयुष्य बालसुखापासून वंचित राहते. तिची घुसमट, बागडायचे स्वप्न.. निरागसता अशा सुंदर मांडणीमधून हे बालनाट्य आकार घेत जाते. देवत्वाचा गंभीर मुखवटा घालणे किती भयंकर आहे असा नाटकाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात
आलेला प्रश्न मन अस्वस्थ करून
जातो. त्यानंतर ग्रीप्स थिएटरच्या ‘जंबा बंबा बू’ या श्रीरंग गोडबोले आणि विभावरी देशपांडे लिखित सादर झालेल्या बालनाट्यानेही रंगत आणली. बालनाट्य फक्त लहान मुलेच सादर करतात अशी एक धारणा असते. मात्र तरुणांनी हे बालनाट्य सादर करून एक वेगळी उंची या आविष्काराला दिली. जंगल बुकमधील ‘मोगली’ हे लहान मुलांचे अत्यंत आवडते पात्र. या मोगलीला शहरात आणल्यानंतर घडणाºया गमतीजमतींमधून हे बालनाट्य धमाल उडवते. छोट्याशा लाल चड्डीमध्ये सक्षम कुलकर्णीने साकारलेला मोगली रसिकांची मने जिंकतो. शाळेत प्रवेश घेताना ‘धर्म’ लिहिणे किती आवश्यक आहे याकडे लक्ष वेधत सर्वधर्म समभावाची शिकवण देणाºया शाळांमध्येच धर्म, जात यांचे संस्कार कसे दिले जातात यावर हे नाटक नकळतपणे भाष्य करते. मग मोगलीचा धर्म कोणता? या शोधाचा प्रवास सुरू होतो.
बालरंगभूमीच्या भवितव्याविषयी एकीकडे चिंता व्यक्त केली जात असताना बालनाट्यांना झालेली ही गर्दी नक्कीच दिलासा देणारी ठरली आहे.