मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक सध्या बंद आहे. लॉकडाऊन नंतर ही वाहतूक सुरु होईल तेव्हा प्रवाशांना दिलासादायक, प्रसन्न व आनंददायक वातावरणाचा अनुभव घेण्यात यावा यासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गार्डनचा कायापालट करण्यात आला आहे.
प्रवास करताना प्रवाशांना कोरोना किंवा इतर कोणत्याही आजारामुळे निराशा वाटू नये, औदासीन्य येऊ नये व प्रसन्न व वाटावे व मानसिक शांती मिळावी यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. मुंबई विमानतळाच्या परिसरात 19 एकर जमिनीवर 76 हजार चौरस फूट पेक्षा अधिक जागेवर असलेल्या गार्डनचा कायापालट करण्यात आला आहे. देशातील विमानतळावरील हे सर्वात चांगले गार्डन असल्याचा दावा व्यवस्थापनाने केला आहे. लॉकडाऊन काळात कमी मनुष्यबळामध्ये देखील परिसर हिरवा राहण्यासाठी कर्मचारी झटत आहेत. विमानतळाच्या आत असलेल्या गार्डनमुळे प्रवासाचा ताण, इतर तणाव दूर होण्यास प्रवाशांना मदत होते. या ठिकाणी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी व प्रमाणबध्द पाणी मिळावे यासाठी स्वयंचलित इरिगेशन पध्दतीचा अवलंब करण्यात आला आहे. विमानतळावरील विविध गार्डनची देखभाल करण्यासाठी 80 माळ्यांची व इरिगेशन इंजिनियर, हॉर्टीकल्चरिस्ट अशांची टीम कार्यरत आहॆ. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करुन ही टीम काम करत आहे. दररोज पाच ते सहा तास ही टीम काम करते. या कर्मचाऱ्यांना घरापासुन विमानतळावर जाण्यायेण्यासाठी बेस्ट बस सेवा वापरण्यात येत आहे. पोलिसांकडून त्यासाठी विशेष पास उपलब्ध करुन घेण्यात आले आहेत. विमानतळाच्या परिसरातील झाडांमुळे शुध्द हवा मिळणे सहजशक्य होत आहे.