मुंबई : गेल्या काही दिवसांत तापमानात बदल झाल्यामुळे मुंबईकर सध्या उकाड्याने त्रस्त झाले आहेत. ऑक्टोबर हीटमध्ये ज्या पद्धतीने कडक उन्हाचा अनुभव नागरिकांना येत असतो, तसाच अनुभव सध्या नागरिक घेताना दिसत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील पाऊस गायब झाला आहे. हवामानाच्या बाबतीत जी परिस्थिती राज्यातील ग्रामीण भागात आहेत त्याच पद्धतीचे वातावरण मुंबईत असल्यामुळे नागरिक घामाच्या धारांमध्ये ओले चिंब झालेले पाहायला मिळत आहेत. या दमट हवामानामुळे काही नागरिकांना डिहायड्रेशनचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या काळात जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आवाहन वैद्यकीयतज्ज्ञ करत आहेत.
सप्टेंबर महिन्यात सहसा पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असतो. अनेकवेळा गणरायाच्या आगमन सोहळ्याला पाऊस असतो. मात्र यावर्षी वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. कडक उन्हाच्या झळांमुळे नागरिक पायी चालताना अधिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ट्रेन आणि बसमधून कामाच्या वेळी प्रवास करताना या गर्मीने नागरिकांचा जीव नकोसा करून टाकला आहे. या उन्हाचा त्रास लहानग्यांपासून जेष्ठांपर्यंत सगळ्यांनाच होत आहे.
पावसाळी आजारांचे रुग्ण वाढले सध्या वातावरणात कडाक्याचे ऊन असले तरी पावसाळी आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू , मलेरिया या पावसाळी आजरांचे रुग्ण अधिक दिसून येत आहेत. तसेच व्हायरल इन्फेक्शनने तर कहर केला आहे. अनेक ठिकाणी नागरिक खोकल्याने आणि सर्दीने त्रस्त आहेत. सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये रुग्णाची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे कोणत्याही रुग्णाला दाखल करण्याची वेळ येत नसून दोन-तीन दिवसांत हा आजार बरा होत आहे.
या वातावरणामुळे खूप घाम येतो. शरीरातील संपूर्ण पाणी शोषून घेतले जाते. त्यामुळे लघवीचे प्रमाण कमी होते. तसेच, शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सवर (पोटॅशिअम, सोडियम, क्लोराईड) परिणाम होतो. त्यामुळे चक्कर येणे, गोंधळलेली परिस्थिती निर्माण होण्यासारखी लक्षणे दिसू लागतात. डिहायड्रेशनचे रुग्ण ओपीडीमध्ये येत आहेत. त्यांना ओआरएस घेण्यास सांगितले जाते. - डॉ. मधुकर गायकवाड, सहयोगी प्राध्यापक, जे. जे. रुग्णालय
पावसाळ्यात हवामान खूप थंड असते, पण आता तापमान अचानक बदलल्यामुळे अनेकांना डिहायड्रेशन, चक्कर येणे, उलट्या होणे आणि व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होत आहे. तुमच्या आहारात द्रव पदार्थांचा समावेश करा. काकडी, कलिंगड, संत्री आणि स्ट्रॉबेरी यांसारखी फळे व भाज्यांचा आहारात समावेश करा. - डॉ. छाया वजा, जनरल फिजिशियन, अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालय