ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - सेनेची साथ सोडून भाजपात गेलेल्या घटकपक्षांच्या नेत्यांच्या हाती फारसे काही लागले नसल्याचे सांगत महादेव जानकरांना आठवलेंसारखाच अनुभव आल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून जानकरांवर निशाणा साधण्यात आला आहे. आठवल्यांना दिलेल्या जागांवर भाजपने स्वत:चे उमेदवार घुसवले, जानकरांचेही तेच झाले असे अग्रलेखात म्हटले आहे.
पक्ष तिरडीवर गेला तरी चालेल, पण आम्हाला पदांचे गूळ-खोबरे मिळाले तरच समाजाचे कल्याण होईल असे घटक पक्षाच्या नेतेमंडळींना वाटते, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे. शिवसेना आता एकाकी पडली आहे, सेनेची कोंडी झाली आहे, या सर्व गोष्टींत तथ्य नाही. घटक पक्षाचे नेते गेले असले तरी सारा बहुजन समाज हा परंपरेने शिवसेनेबरोबरच आहे असा विश्वास उद्धव यांनी व्यक्त केला आहे. भाजपासोबत गेलेल्या 'चव्वनी’ छाप पुढार्यांच्या हाती नक्की काय लागले? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. जानकरांच्या हातात भाजपाने पाचेक पडीक जागा ठेवल्या आहेत, यामुळे जानकर संतापले असले तरी आपण समाधानी आहोत, असेच ते दाखवत आहेत. स्वत:ला पदे मिळाली की समाजाचे कल्याण होईल असे वाटणा-या नेत्यांची मिरासदारी या निवडणुकीत मोडल्याशिवाय राहणार नाही, असेही लेखात नमूद करण्यात आले आहे.
काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात?
- महायुतीतील सर्व घटक पक्ष भाजपबरोबर पळून गेल्याने शिवसेनेची कोंडी झाली. शिवसेना एकाकी पडली असे बोलले जात आहे. त्यात अजिबात तथ्य नाही. घटक पक्षाचे नेते गेले तरी सारा बहुजन समाज हा परंपरेने शिवसेनेबरोबरच आहे हे निवडणूक निकालांतून स्पष्ट होईल. पुन्हा स्वत:ला आपापल्या समाजाचे नेते म्हणवून घेणार्या ‘चव्वनी’ छाप पुढार्यांच्या हाती नक्की काय लागले? हा संशोधनाचाच विषय आहे.
- घटक पक्षाचे नेते आज तसे हात चोळत व कपाळ बडवीत बसले आहेत. जे रामदास आठवले यांचे झाले तेच महादेव जानकर यांच्या बाबतीत घडले आहे. जानकर हे राष्ट्रीय समाज पार्टीचे महापुरुष आहेत व त्यांच्या हातावरही भाजपने पाचेक पडीक जागा ठेवल्या आहेत. बहुधा जानकरांना अमेरिका, रशिया, जपानसारख्या देशांत ‘हायकमिशनर’ म्हणून पाठविण्याचे आश्वासन दिले असावे. म्हणूनच स्वाभिमानाची व धनगर समाजाच्या अस्मितेची लढाई लढण्याची भाषा करणारे महादेवराव इतक्या अपमानानंतरही गप्प बसले आहेत.
- महाराष्ट्रातील धनगर समाजात बरेच नेते आहेत, पण सारा समाज कुण्या एका नेत्याच्या पाठीशी नाही. विखुरलेले असते आणि ते समाजातील इतरही नेत्यांच्या मागे धावत असते. शिवसेनाप्रमुखांनी नेहमीच जाती-पातीपलीकडे जाऊन राजकारण केले. ते स्वत: मराठा किंवा बहुजन समाजाचे नव्हते. तरीही मराठा आणि बहुजन समाज नेहमीच मोठ्या प्रमाणावर शिवसेनाप्रमुखांच्या मागे ठामपणे उभा राहिला. त्यांना
शिवसेनाप्रमुखांविषयी ठाम विश्वास होता म्हणूनच हे घडू शकले.
- महादेव जानकरांसारखे लंबक जातीय लोकसंख्येच्या गणितावर कधी इकडे तर कधी तिकडे लटकत असतात. अर्थात जो तो आपापल्या मगदुराप्रमाणे वागत असला तरी समाज काही मुक्या मेंढराप्रमाणे जानकरांच्या मागे जात नाही. आम्हाला आतापर्यंत धनगर समाजाचे शेकडो कार्यकर्ते व प्रतिष्ठित पुढारी भेटले व त्यांनी सांगितले की, भगवा झेंडा हाच त्यांचा पंचप्राण आहे. महाराष्ट्रात भगवा झेंडा डौलाने फडकविण्यासाठी हे सर्व लोक कटिबद्ध आहेत.
- शिवसेनेवर त्यांचा विश्वास आहे. शिवसेना शब्दाला पक्की आणि सच्ची आहे याविषयी त्यांना खात्री आहे. शब्द एक आणि कृती भलतीच असे आम्ही कधीच केलेले नाही आणि करणारही नाही. आम्हाला इतरांनी काय आश्वासने दिली आणि ती किती पाळली यामध्ये अजिबात रस नाही. मात्र शेवटी आठवल्यांसारखाच अनुभव जानकरांनाही आलाच ना? आठवल्यांना दिलेल्या जागांवरही भाजपने स्वत:चे उमेदवार घुसवले. जानकरांचेही तेच झाले. पक्ष तिरडीवर गेला तरी चालेल, पण आम्हाला पदांचे गूळ-खोबरे मिळाले तरच समाजाचे कल्याण होईल असे घटक पक्षाच्या नेतेमंडळींना वाटत आहे. नेत्यांची ही मिरासदारी या निवडणुकीत मोडल्याशिवाय राहणार नाही.