लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा मोठा फटका कलावंतांना बसला आहे. अनेकांचा तर रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जगण्यासाठी कलावंतांच्या सुरू असलेल्या एकूणच धडपडीकडे शासनाचे लक्ष जावे, या हेतूने महाराष्ट्राच्या विविध स्तरातील कलावंत आता यासाठी एकत्र आले आहेत. हे कलावंत ‘रंगकर्मी आंदोलन, महाराष्ट्र’ या मंचाखाली एकवटले असून, येत्या ९ ऑगस्ट रोजी राज्यातील २६ जिल्ह्यांत हे कलावंत आंदोलन करणार आहेत.
या आंदोलनाच्या संदर्भात या मंचातर्फे बुधवारी मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
केवळ चित्रपट, नाटक या क्षेत्रातील कलावंतच नव्हेत; तर तमाशा, भजन, कीर्तन, वाद्यवृंद, भारूड, गोंधळ, पोवाडा, लावणी, दशावतार, डोंबारी, पोतराज या आणि अशा लोककलेच्या प्रांतात कार्य करणाऱ्या जिल्हा पातळीवरील असंख्य कलाकारांचाही यात समावेश आहे. कोरोनाकाळातील मागण्या व कायमस्वरूपी मागण्या असे दोन भाग यासंबंधी या कलावंतांनी केले आहेत. कोरोनाकाळातील स्थिती पूर्ववत होईपर्यंत महाराष्ट्रातील रंगकर्मींना दरमहा पाच हजार रुपये मिळावेत, ‘रंगकर्मी रोजगार हमी योजना’ लागू करावी, रंगकर्मींची शासन दरबारी नोंद व्हावी, ‘रंगकर्मी बोर्ड’ स्थापन करावे, निराधार आणि वयोवृद्ध रंगकर्मींची शासकीय व खाजगी वृद्धाश्रमांत सोय करावी, शूटिंग सुरू असलेल्या कलाकार व तंत्रद्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी मिळावी आदी १४ मागण्या या मंचातर्फे करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, २९ जुलै रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना नियोजित आंदोलनाबाबत पत्रे देण्यात येणार असल्याचे या मंचातर्फे बोलताना रंगकर्मी संचित यादव यांनी स्पष्ट केले. हे आंदोलन पक्षविरहित असून, कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी वगैरे यावेळी केली जाणार नाही. शासनाचे कलावंतांकडे लक्ष वेधून घेणे, हा या आंदोलनाचा हेतू असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. विजय पाटकर, मेघा घाडगे, विजय गोखले, विजय राणे, चंद्रशेखर सांडवे, शिरीष राणे, हरी पाटणकर यांच्यासह या क्षेत्रातील अनेक कलावंत यावेळी उपस्थित होते.
कलावंतांकडे लक्ष द्यावे
हे आंदोलन सरकारविरोधी नाही; परंतु सवडीनुसार त्यांनी आमच्याकडे बघावे. या आंदोलनात कलावंत त्यांची कला सादर करून जागर करणार आहेत. मोर्चा किंवा भाषणबाजी असे या आंदोलनाचे स्वरूप नसेल. कलाकारांचे प्रश्न कायमस्वरूपी सुटावेत, हा यामागचा उद्देश आहे.
- विजय पाटकर, ज्येष्ठ रंगकर्मी