शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग; उद्धव ठाकरे - प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येत केली युतीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 06:59 AM2023-01-24T06:59:44+5:302023-01-24T07:00:02+5:30

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आगामी निवडणुकांसाठी सोमवारी युतीची घोषणा केली.

Experiment of Shiva Shakti Bhim Shakti Uddhav Thackeray and Prakash Ambedkar came together and announced the alliance | शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग; उद्धव ठाकरे - प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येत केली युतीची घोषणा

शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग; उद्धव ठाकरे - प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येत केली युतीची घोषणा

Next

मुंबई :

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आगामी निवडणुकांसाठी सोमवारी युतीची घोषणा केली. देशाची हुकूमशाहीकडे चाललेली वाटचाल रोखण्यासाठी, देश प्रथम हे उद्दिष्ट समोर ठेवून एकत्र येत आहोत, असे दोन्ही नेत्यांकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७व्या जयंती दिनी जाहीर करण्यात आले.

यापूर्वी शिवसेनेसोबत झालेल्या सर्व युतींचे निर्णय मातोश्रीवरून जाहीर झाले आहेत. मात्र, यावेळी प्रथमच उद्धव ठाकरे हे युतीची घोषणा करण्यासाठी दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथील संयुक्त पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले. वैचारिक प्रदूषणातून देशाला मोकळा श्वास घेण्यासाठी, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी व घटनेचे पावित्र्य जपण्यासाठी आम्ही दोघे एकत्र आलो, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 

कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नाही : आंबेडकर
ईडीच्या माध्यमातून देशातले राजकीय नेतृत्व संपवण्याचा घाट घातला जातो आहे. मात्र, कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नाही. नरेंद्र मोदींचाही एक दिवस पक्षात अंत होणार आहे. त्यांनीही पक्षातील नेतृत्व संपवल्याची टीका आंबेडकर यांनी केली.

वेळ आल्यावर जागा वाटपाचा निर्णय : उद्धव
वंचित व शिवसेना जागा वाटपाच्या निर्णयाबाबत बोलताना अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. हिंमत असेल तर निवडणुका घ्याच, असे आव्हान देत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. वेळ आल्यावर कोणत्या जागा लढवायच्या तोही निर्णय घेऊ. दोघांची पुढे राजकीय वाटचाल कशी असेल, आणखी काय करता येईल, या सर्व गोष्टींचा त्या-त्या वेळेला जशी वेळ येईल तसा विचार केला जाईल, असेही ते म्हणाले.

‘वंचित’चा महाविकास आघाडीत समावेश आहे का?
- वंचितला मविआमध्ये घेण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीची तयारी आहे का, यावर उद्धव ठाकरे म्हणाले, आम्हाला काल रात्री स्वप्न पडलं आणि आम्ही आज एकत्र आलो असे नाही. यापूर्वी आमच्या बैठका झाल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबरही आमची चर्चा झाली आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी बरोबर येण्यास कोणाचीही हरकत नाही. 

- यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत शेतातील भांडण नाही तर त्यांच्यासोबत मुद्द्याची भांडणे आहेत. ते आमच्यासोबत येतील, अशी अपेक्षा बाळगतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आमची युती स्वीकारतील, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Web Title: Experiment of Shiva Shakti Bhim Shakti Uddhav Thackeray and Prakash Ambedkar came together and announced the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.