नाट्य परिषदेत वादळी अंकाचा प्रयोग!, पत्रकार परिषद अडचणीत? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 06:48 AM2021-02-15T06:48:46+5:302021-02-15T06:49:04+5:30

Natya Parishad : नाट्य परिषद अध्यक्ष, समिती आणि नियामक मंडळाचे सदस्य; यांच्या भूमिका असलेल्या या प्रयोगाचा अंतिम चरण १८ फेब्रुवारी रोजी लिहिला जाणार आहे.

Experiment with storm issue in Natya Parishad !, Press conference in trouble? | नाट्य परिषदेत वादळी अंकाचा प्रयोग!, पत्रकार परिषद अडचणीत? 

नाट्य परिषदेत वादळी अंकाचा प्रयोग!, पत्रकार परिषद अडचणीत? 

Next

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेत सध्या वादळी अंकाचा प्रयोग रंगला असून, येत्या चार दिवसांत तो पूर्णत्वास जाण्याची चिन्हे आहेत. नाट्य परिषद अध्यक्ष, समिती आणि नियामक मंडळाचे सदस्य; यांच्या भूमिका असलेल्या या प्रयोगाचा अंतिम चरण १८ फेब्रुवारी रोजी लिहिला जाणार आहे. या दिवशी नियामक मंडळाच्या सदस्यांनी विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीनंतर नाट्य परिषदेच्या रंगमंचावर नवीन नाट्य उदयास येणार असल्याची चर्चा नाट्यवर्तुळात आहे.
नाट्य परिषदेच्या अध्यक्षांविरोधात नियामक मंडळातील सदस्यांनी गेल्या महिन्यात अविश्वासदर्शक ठराव आणल्यानंतर, वास्तविक अध्यक्ष व प्रमुख कार्यवाह यांनी विशेष नियामक बैठक घेऊन बहुमत सिद्ध करणे आवश्यक होते. मात्र तसे घडले नाही; त्यामुळेच नियामक मंडळाच्या सदस्यांकडून १८ फेब्रुवारीच्या विशेष बैठकीचे आयोजन केले गेले असल्याचे वृत्त आहे. गेल्या महिन्यात नियामक मंडळाच्या बैठकीत, नियामक मंडळाच्या ३३ सदस्यांनी अध्यक्षांविरुद्ध अविश्‍वासदर्शक ठरावाचे पत्र दिले होते. त्यानुसार विशेष बैठकीचे आयोजन करून त्याची सूचना सात दिवस अगोदर देणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. अविश्वासदर्शक ठराव आल्यानंतर अध्यक्ष व प्रमुख कार्यवाह यांनी विशेष बैठकीचे आयोजन केले असते, तर चित्र वेगळे दिसले असते असे नाट्यवर्तुळात बोलले जात आहे. 
अविश्वासदर्शक ठराव मांडलेल्या नियामक मंडळाच्या सदस्यांनी आता याबाबत १८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता यशवंत नाट्यसंकुलात विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. अविश्वासदर्शक ठरावात ३३ सदस्यांनी सह्या केल्या होत्या आणि आता त्यात अजून सात जणांची भर पडून अध्यक्षांच्या विरोधात ४० सदस्य उभे राहिल्याचे समजते. परिणामी, १८ फेब्रुवारीची बैठक निर्णायक ठरणार का, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र ही बैठक वादळी ठरेल, असे बोलले जात आहे. या दिवशी नवीन अध्यक्ष आणि समिती निर्माण होण्याचीही चिन्हे आहेत. तसे झाले, तर नाट्य परिषदेच्या नाट्यातील भूमिका आणि कलावंत बदललेले दिसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

पत्रकार परिषद अडचणीत? 
नाट्य परिषदेतील आतापर्यंतचे एकूणच नाट्य पाहता, नाट्य परिषदेतर्फे मंगेश कदम यांनी १६ फेब्रुवारी रोजी एकंदर भूमिका स्पष्ट करण्यासाठी यशवंत नाट्यमंदिरात पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. मात्र नियामक मंडळातील सदस्यांनी या पत्रकार परिषदेलाच हरकत घेतली आहे. याबाबत, नियामक मंडळाच्या बहुमताच्या निर्णयाविरुद्ध कोणतीही भूमिका मांडण्याचा अधिकार त्यांना नाही, अशी भूमिका नियामक मंडळाच्या सदस्यांनी घेतली असल्याचे समजते. कोणत्या अधिकारात ही पत्रकार परिषद घेतली जात आहे, असा सवालही नियामक मंडळाच्या सदस्यांनी केला असल्याचे कळते. परिणामी, १६ फेब्रुवारीची ही पत्रकार परिषद होणार की नाही, यावर सध्या तरी प्रश्नचिन्ह आहे.

Web Title: Experiment with storm issue in Natya Parishad !, Press conference in trouble?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई