गोवर नियंत्रण मुंबई मॉडेल देशभर राबवा; तज्ज्ञांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 10:31 AM2024-04-09T10:31:11+5:302024-04-09T10:31:50+5:30
जागतिक आरोग्यदिनी ९५ टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट.
मुंबई : गोवर उद्रेक नियंत्रण मुंबई मॉडेल संपूर्ण भारतामध्ये राबविण्यात यावा, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले. जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातील आरोग्य अधिकारी यांच्यासाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. याप्रसंगी जागतिक आरोग्य संघटनेचे दिल्ली, तसेच महाराष्ट्र स्तरावरील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. त्यावेळी तज्ज्ञ बोलत होते.
लसीकरण बळकटीकरणासाठी तसेच गोवर, रुबेला लसीकरण करण्याचा उद्दिष्ट पालिकेचा आहे. वर्ष २०२४-२०२५ मध्ये गोवर रुबेला लसीकरण ९५ % पूर्ण करण्याचे उद्दिष्ट या कार्यशाळेत ठेवण्यात आले आहे.
यंदाच्या आरोग्य दिनाचे घोषवाक्य ‘माझं आरोग्य, माझं अधिकार’ आहे. यानुसार मोठ्यांच्या आरोग्याप्रमाणे लहान बाळांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी मुलांचे लसीकरण करणे आवश्यक आहे.- दक्षा शहा, कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका आरोग्य विभाग
कार्यशाळेतून जागृती-
२ दिवसांच्या या कार्यशाळेत लसीकरणास नकार, आरोग्य कर्मचाऱ्यांचे सामाजिक संवाद कौशल्य, सूक्ष्मकृती आराखडा, लसीकरणाचे प्रमाण कमी असलेल्या कार्यक्षेत्रात लसीकरण वाढविण्याबाबतची कृती, जोखीमग्रस्त भागात लसीकरण वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सहा गट बनवणे, या विषयांचा समावेश होता.
महापालिकेतील तज्ज्ञ डॉक्टरांचें मार्गदर्शन -
२०२४-२०२५ वर्षांमध्ये गोवर रुबेला लसीकरण ९५ टक्के पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत. उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने करावयाच्या कार्यवाहीबाबत जागतिक आरोग्य संघटना, महानगरपालिकेतील अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
आरोग्य अधिकाऱ्यांना मार्गदर्शन-
१) डॉक्टरांनी जागतिक, तसेच भारतीय स्तरावरील नियमित लसीकरण आणि गोवर रुबेला उद्रेकाविषयी आकडेवारी सादर करून त्यावर चर्चा केली, तसेच २०२२-२३ मध्ये मुंबई गोवर उद्रेक नियंत्रण मॉडेलचे कौतुकदेखील डॉक्टरांनी केले.
२) दोन दिवसीय कार्यशाळेमुळे सर्व आरोग्य अधिकाऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण होऊन एका नवीन दिशेकडे पाऊल टाकण्यात येईल, असा विश्वास सर्व आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.