टास्क फोर्समधील तज्ज्ञ डाॅक्टरांनी साधला खासगी डाॅक्टरांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:06 AM2021-05-10T04:06:15+5:302021-05-10T04:06:15+5:30
मुख्यमंत्र्यांची संकल्पना; कोविड सेंटरसाठी नाव नोंदविण्याचे केले आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य टास्क फोर्समधील तज्ज्ञ डाॅक्टरांनी मुंबईतील ...
मुख्यमंत्र्यांची संकल्पना; कोविड सेंटरसाठी नाव नोंदविण्याचे केले आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य टास्क फोर्समधील तज्ज्ञ डाॅक्टरांनी मुंबईतील ७०० खासगी डाॅक्टरांशी व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे कोरोनावरील उपचारांबाबत चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून या चर्चासत्रांचे आयोजन केले जात आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करत थेट तळागाळात काम करणाऱ्या डाॅक्टरांशी बोलण्याचा, त्यांच्या सूचना ऐकण्याचा हा उपक्रम आहे. येत्या काळात राज्यातील इतर विभागांतील डाॅक्टरांशीही अशा पद्धतीने संवाद साधला जाईल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन बैठकीच्या माध्यमातून सर्व डाॅक्टरांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले. कोरोनाकाळात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका महत्त्वाची आहे. कोणत्याही आजारात रुग्ण पहिल्यांदा फॅमिली डॉक्टरशी संपर्क साधतो. सर्वसामान्यांना आपण ‘माझा डॉक्टर’ बनून त्यांना मार्गदर्शन केल्यास रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तो रोखण्यात मोठी मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याशिवाय घरीच विलगीकरणात असलेल्या रुग्णांकडे डाॅक्टरांनी लक्ष देणे, त्यांची विचारपूस करीत राहणे गरजेचे आहे. या रुग्णांना प्रोटोकॉलप्रमाणे उपचार मिळतात किंवा नाही याकडे व्यक्तिश: लक्ष द्यावे तसेच वॉर्ड अधिकाऱ्यांनाही योग्य ती माहिती वेळोवेळी दिल्यास रुग्णांच्या बाबतीत पुढील व्यवस्थापन करणे पालिकेला सोपे जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आपल्या परिसरातील कोविड उपचार केंद्र किंवा जम्बो केंद्रांतील आवश्यकता लक्षात घेत खासगी डाॅक्टरांनी तिथेही आपली नावे नोंदवावी असे आवाहन करतानाच राज्यात सर्वत्रच उपचार पद्धतीत एकवाक्यता असणे महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. खासगी डॉक्टर्सवर विश्वास ठेवून त्यांना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेत असल्याबद्दल अनेक डाॅक्टरांनी यावेळी समाधान व्यक्त केले. तसेच आयुर्वेद, होमिओपॅथी डॉक्टरांना यात सहभागी करून घेण्याचीही विनंती काही डाॅक्टरांनी केली.
* टास्क फोर्सने केले शंकांचे निरसन
यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित तसेच डॉ. तात्याराव लहाने यांनी कोविडकाळातल्या उपचार पद्धतीवर डॉक्टर्सना मार्गदर्शन केले व त्यांच्या शंकांचे निरसन केले.
स्टेरॉइड्सचा वापर किती प्रमाणात करावा, सहा मिनिटे वॉक टेस्टचे महत्त्व, ऑक्सिजनची गरज आहे ते नेमके कसे ओळखावे, ऑक्सिजन पातळी धोकादायक स्थितीत आहे म्हणजे नेमके काय, रेमडेसिविर कधी आणि किती वापरावे, व्हेंटिलेटरवरील रुग्णांची काळजी, रक्तशर्करा स्थिर राहण्याकडे कसे लक्ष द्यावे आदींबाबत मोलाचे मार्गदर्शन व शंका निरसन यावेळी करण्यात आले. आरटीपीसीआर चाचणीचे महत्त्व, सीटी स्कॅनची नेमकी किती गरज यावरही या सभेत मार्गदर्शन करण्यात आले.
कोरोनाची लक्षणे फसवी असतात, त्यामुळे येणारा प्रत्येक रुग्ण हा कोरोनाचा तर नसेल ना, हा प्रश्न आपल्या मनात उपस्थित ठेवून त्याची तपासणी डॉक्टर्सनी करणे गरजेचे आहे असेही यावेळी सांगण्यात आले.
* लहान मुलांकडे लक्ष ठेवा
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात ठेवून राज्यात बालरोगतज्ज्ञांची एक टास्क फोर्स निर्माण करण्यात येत आहे. याविषयी या सभेत माहिती देण्यात आली. तसेच लहान मुलांच्या वर्तणुकीतील बदल, त्यांना होणारी सर्दी, ताप, डायरिया, दूध व अन्न खाणे कमी करणे किंवा बंद होणे अशा लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
...................................