लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईच्या वैद्यकीय वर्तुळात निष्णात स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे दहिसर येथील सुश्रूत इस्पितळाचे संचालक डॉ. अशोक मुळगांवकर यांचे साेमवारी सायंकाळी हिंदुजा हाॅस्पिटलमध्ये न्युमोनियाच्या तीव्र संसर्गाने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी अपर्णा, पुत्र हृषिकेश, कन्या मुग्धा असा परिवार आहे.
वैद्यकीय व्यवसायाकडे एक समाजकार्य म्हणून पाहत आलेल्या डॉ. मुळगांवकर यांनी वसई तालुक्यापासून आपल्या सेवेला प्रारंभ केला. १९७८ सालच्या सुमारास त्यांनी दहिसर पूर्व येथे सुश्रूत इस्पितळाची उभारणी करून लाखो रुग्णांवर उपचार केले. डॉ. मुळगांवकर दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक सदस्य आणि कार्याध्यक्ष म्हणून ही कार्यरत होते. त्यांच्या निधनाने आपण एक कुशल संस्थाचालक आणि जवळचा मित्र गमावला, अशा भावना शिवसेना उपनेते आणि म्हाडाचे सभापती डॉ. विनोद घोसाळकर यांनी व्यक्त केल्या.
दहिसरच्या सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील कलाकार, खेळाडूंना प्रोत्साहित करणाऱ्या
प्रमुख व्यक्तींमध्ये डॉ. मुळगांवकर यांचा समावेश होता. त्यांचे या क्षेत्रातील तसेच वैद्यकीय क्षेत्रातील योगदान अजोड असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी ते एक आधारवड होते.
---------------------------------------------