कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचे अनुभवकथन प्रेरणादायी
By admin | Published: April 21, 2017 01:02 AM2017-04-21T01:02:28+5:302017-04-21T01:02:28+5:30
‘वीरप्पन चेसिंग द ब्रिगन्ड’ या पुस्तकामुळे एका गुन्हेगाराविरोधात कर्तव्यनिष्ठेने दिलेल्या लढ्याचे दर्शन घडते. सेवेशी निष्ठा ठेवून काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या
मुंबई : ‘वीरप्पन चेसिंग द ब्रिगन्ड’ या पुस्तकामुळे एका गुन्हेगाराविरोधात कर्तव्यनिष्ठेने दिलेल्या लढ्याचे दर्शन घडते. सेवेशी निष्ठा ठेवून काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या या लेखनामुळे इतर अधिकाऱ्यांनाही प्रेरणा मिळेल, असे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी सांगितले.
चंदन तस्कर व गुन्हेगार वीरप्पन याच्याविरुद्ध यशस्वी कारवाई करणारे सीआरपीएफचे निवृत्त महासंचालक के. विजय कुमार यांच्या ‘वीरप्पन चेसिंग द ब्रिगन्ड’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध अभिनेता अक्षयकुमार यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. चर्चगेट येथील सी.के. नायडू हॉल, क्रिकेट क्लब आॅफ इंडिया येथे हा कार्यक्रम पार पडला. या वेळी निवृत्त पोलीस अधिकारी (आयपीएस) सतीश सहानी, पोलीस महासंचालक सतीश माथुर, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांच्यासह गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुस्तक प्रकाशनानंतर अभिनेते अक्षयकुमार यांनी के. विजयकुमार यांची प्रकट मुलाखत घेतली. या वेळी त्यांनी वीरप्पनविरुद्ध केलेल्या ‘आॅपरेशन ककून’ संदर्भात माहिती दिली. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये वीरप्पनविरोधात तामिळनाडू सरकारने स्पेशल टास्क फोर्सची निर्मिती केली. विजयकुमार यांच्याकडे या फोर्सच्या प्रमुख पदाची जबाबदारी होती. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडून, दोन दशके विघातक कारवाया करणाऱ्या वीरप्पनची गुन्हेगारी समूळ नष्ट केल्याचे विजयकुमार यांनी याप्रसंगी सांगितले. या मोहिमेबद्दल अक्षयकुमार यांनी विचारलेल्या प्रश्नांना विजयकुमार यांनी मनमोकळी उत्तरे दिली. सतत मोहिमेवर व फायटिंगच्या भूमिकेत असणाऱ्या माझ्यासारख्या पोलीस अधिकाऱ्याला लिहिणे हे थोडेसे कठीण वाटले. तरीही माझ्या अनुभवाशी प्रामाणिक राहून हे पुस्तक लिहिले आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)