महानगरातील CCTV प्रकल्प सल्लागार कंपनीला मुदतवाढ, 10 वर्षांपासून कार्यरत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 10:02 PM2019-08-25T22:02:30+5:302019-08-25T22:04:49+5:30
सीसीटीव्ही प्रकल्पातर्गंत मुंबई पोलीस व शासनाला सहाय्य करण्यासाठी तज्ञ सल्लागारांची निवड राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत पीडब्ल्यूसी कंपनींची १७ नोव्हेंबर २००९ रोजी करण्यात आली.
मुंबई : मुंबई शहरातील सीसीटीव्ही प्रकल्पाचे सल्लागार म्हणून काम पहात असलेल्या मे. पीडब्लूसी या कंपनीला पुन्हा पाच महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांपासून त्यांच्याकडून काम पाहिले जात असून सात तज्ञ अधिकाऱ्यांकडे ३० सप्टेंबरपर्यत जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
सीसीटीव्ही प्रकल्पातर्गंत मुंबई पोलीस व शासनाला सहाय्य करण्यासाठी तज्ञ सल्लागारांची निवड राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत पीडब्ल्यूसी कंपनींची १७ नोव्हेंबर २००९ रोजी करण्यात आली. त्यासाठी जागतिक निविदा प्रक्रिया राबवून त्याद्वारे ही नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर शासनाकडून सातत्याने त्यांना मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यांचा मागील कराराचा कालावधी ३० एप्रिलला संपला होता. त्यानंतर पुन्हा ५ महिने मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून पाठविण्यात आला होता. गृह विभागाच्या उच्चस्तरीय शक्ती प्रदान समितीने त्या प्रस्तावाला मंजूरी दिली होती. त्यामुळे या कंपनीला पुन्हा ३० सप्टेंबरपर्यत मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगण्यात आले.