लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शहरातील प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी बांधकामांच्या ठिकाणी स्प्रिंकलर, स्मॉग गन यासह विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यासाठी महापालिकेने विकासकांना महिनाभराची मुदत दिली होती. दरम्यान, शनिवारीही मुदत संपत आहे. नियम न पाळणाऱ्यांवर पालिका काय कारवाई करणार, याकडे लक्ष आहे.
२३ तारखेपर्यंत पालिकेकडून एकूण ६६७ बांधकामांना स्टॉप वर्क नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यानंतरही विकासक, प्रकल्पांकडून नियमांची अंमलबाजवणी झाली नाही तर थेट गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. आतापर्यंत पालिकेकडून एका विकासकावर गुन्हा दाखल केला.पायाभूत सुविधांची कामेनियमांचे उल्लंघन करणाऱ्या बहुतांशी आस्थापना उपनगरांतील आहेत, ज्यात अंधेरी पूर्व, बीकेसी आणि वांद्रे पूर्व यासारख्या वॉर्डांचा समावेश आहे. या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत.
नियमांचे पालन केले नाही तर...१५ दिवसांत स्प्रिंकलर्स तर एका महिन्याच्या आत स्मॉग गन बसवण्याचेही परिपत्रकात नमूद आहे. त्यानुसार बांधकामाच्या ठिकाणी स्मॉग गन बसवण्यात आल्या आहेत की नाही, याची तपासणी केली जाईल. त्याचेही पालन न केल्यास काम थांबवण्याची नोटीस किंवा बांधकाम सील करण्याची कारवाईही केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
नोटीसचा आकडा वाढला प्रत्येक वॉर्डात अधिकारी वर्गाने त्यांचा दैनिक ‘कृती अहवाल’ पालिका मुख्यालयात पाठविल्यानंतर यादी दर २४ तासांनी सुधारली जाते. पालिकेने २० नोव्हेंबरपर्यंत ३४३ स्टॉप वर्क नोटीस पाठवल्या होत्या. त्यानंतर २३ नोव्हेंबरपर्यंत यांची संख्या ६६७ वर गेली आहे, म्हणजेच ३ दिवसांत ३४२ नोटीस बांधकामांना दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे पालिकेकडून केल्या जाणाऱ्या कारवाईनंतरही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा आकडा काही केल्या कमी होत नाही.
मार्गदर्शक नियमांच्या अंमलबजावणीसाठी दिलेली मुदत शनिवारी संपत आहे. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना आपण काम थांबविण्याची नोटीस देत आहोत. या सगळ्यांचा पुन्हा एकदा आढावा घेतला जाईल आणि आवश्यकतेप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होईल. - डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त आयुक्त
१,००० बांधकामांना इशारा नोटीससध्या शहरात ६ हजार ६९० बांधकामे आणि पायाभूत सुविधा ठिकाणे असून, त्यापैकी एक हजार बांधकामांना इशारा नोटीस बजावली आहे. यासाठी मुंबई महापालिका मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेत आहे. २५ ऑक्टोबरला मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक जारी करण्यात आले.परिपत्रक जारी केल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत पाण्याची सूक्ष्म फवारणी करणारी यंत्रणा बसवण्यात यावी, असे आदेश देण्यात आले होते, त्यानुसारही पालिकेच्या विशेष पथकाकडून वॉर्ड स्तरावर तपासणी केली जात आहे.