Join us

'तो' विषय चार भिंतीच्या आतला, ठाकरे भेटीनंतर नाराज नसल्याचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2020 8:55 PM

मुंबई - मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या आणि स्थानिक राजकारणात पक्षाविरोधात उघड भूमिका घेणाऱ्या तानाजी सावंत यांनी आपण नाराज ...

मुंबई - मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या आणि स्थानिक राजकारणात पक्षाविरोधात उघड भूमिका घेणाऱ्या तानाजी सावंत यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केलंय. सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर, आपली कधीच नाराजी नव्हती, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. त्यामुळे, उद्धव ठाकरेंकडून काहीतरी ठोस आश्वासन सावंत यांना मिळाल्याची चर्चा आहे. 

मी कधीही नाराज असल्याचं मीडियासमोर बोललो नव्हतो किंवा नाराज असल्याचं कुठे जाहीरपणेही म्हटलं नव्हतं. पण, माझं जे मनोगत असेल, जी माझी इच्छा असेल ते पक्षप्रमुखांकडे तेवढ्या अधिकारानं मांडणं हा माझा हक्क आहे. माझ्या मतदारसंघातील व्यथा आणि समस्या, अडचणी या पक्षप्रमुखांकडे मांडणं हे लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम आहे. माझ्या नाराजीचा विषय नसून तो आमच्या पक्षातील अंतर्गत, चार भिंतीच्या आतला विषय असल्याचं तानाजी सावंत यांनी स्पष्ट केलंय. आमच्या उस्मानाबाद जिल्ह्याची इच्छापूर्ती किंवा लोकांची अपेक्षा पूर्ण झाली नसेल. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उस्मानाबाद जिल्ह्यावर फार काळपर्यंत अन्याय होऊ देणार नाहीत, असेही सावंत यांनी म्हटलंय. कारण, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत उस्मानाबादला चांगल यश मिळाल्याचं सावंत यांनी सांगितलं.   

दरम्यान, नुकत्याच झालेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे ते नाराज होते. त्यानंतर त्यांचे उद्धव ठाकरे यांच्यासोबत खटकेही उडाले होते. उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीत शिवसेनेचे नेते डॉ. तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडीऐवजी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तसेच शिवसेनेच्या एका बैठकीलाही ते अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे सावंत यांच्याविरोधात पक्षामध्ये संतापाचे वातावरण दिसून येत होते. त्यातच, सोलापूरमधील शिवसैनिकांनी तानाजी सावंत यांच्याविरुद्ध बंडही केल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे तानाजी सावंत यांना मंत्रिपद देण्याची मागणी करणाऱे शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यापाठोपाठ आता तानाजी सावंत यांचीही पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी सोलापूरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र, सावंत यांच्या उद्धव ठाकरे भेटीमुळे या चर्चांवर पडदा पडला आहे. 

टॅग्स :तानाजी सावंतशिवसेनाउस्मानाबादउद्धव ठाकरे