Join us

पनवेलमध्ये २१ लाखांची वीजचोरी उघड

By admin | Published: November 02, 2015 1:54 AM

पनवेल तालुक्यामधील वीजचोरी थांबविण्यासाठी महावितरणने धडक मोहीम सुरू केली आहे. तळोजासह नऊ गावांमध्ये धाड टाकून वीजचोरीच्या २७८ घटना उघडकीस आणल्या आहेत

नवी मुंबई : पनवेल तालुक्यामधील वीजचोरी थांबविण्यासाठी महावितरणने धडक मोहीम सुरू केली आहे. तळोजासह नऊ गावांमध्ये धाड टाकून वीजचोरीच्या २७८ घटना उघडकीस आणल्या आहेत. २१ लाख रुपयांची वीज चोरून वापरली असल्याचे निदर्शनास आले असून, संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. विजेची गळती आटोक्यात आणण्यासाठी आणि वीज देयकाची वसुली वाढविण्याकरीता महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळाने वीजचोरीविरोधातील ही मोहीम सुरू केली आहे. पनवेल परिसरामध्ये विजेची गळती मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनास येऊ लागले होते. या परिसरात वीजचोरी करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश करपे यांनी वीजवाहिन्यांवरील वीजगळती कमी करण्यासाठी खास पथक तयार केले आहे. वीजचोरी निदर्शनास आल्यास तत्काळ कारवाई करण्याचे आदेश या पथकाला दिले आहेत. पनवेल एक उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुभाष राठोड यांनी १६, १९ आणि २० आॅक्टोंबरला तळोजा, नावडा, देवीचा पाडा, चिंचवली, शिरवली भोदर, उत्तरपाडासह एकूण नऊ गावांमध्ये धाडी टाकल्या. या परिसरात २७८ जणांनी वीजचोरी केली असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्वांनी तब्बल १ लाख ५५ हजार ५८१ युनिट चोरून वापरले असून, त्याची किंमत २१ लाख रुपये होत आहे. या परिसरात झालेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. वीज कायदा २००३ च्या अधीन राहून वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांना चोरी केलेल्या युनिटची व दंडाच्या रकमेची वीजदेयके वितरीत करण्यात आली आहेत. आतापर्यंत १८ ग्राहकांनी ३ लाख रुपयांची रक्कम महावितरणकडे जमा केली आहे. वीजदेयके नाकारणाऱ्या ४० ग्राहकांवरही वीज कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. वीजचोरी करणे हा दंडनीय अपराध आहे. या गुन्ह्यांत संबंधितांना कारावासाचीही शिक्षा होऊ शकते. वीजचोरीमुळे शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध होत नाही. भारनियमन मुक्तीच्या वाटेतील हा मोठा अडसर असल्याचे मुख्य अभियंता सतीश करपे यांनी सांगितले आहे. वीजचोरी करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)