अधिक दर आकारणाऱ्या रक्तपेढ्यांकडे मागितले स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 05:04 AM2018-09-10T05:04:15+5:302018-09-10T05:04:27+5:30
शहर-उपनगरातील रक्तपेढ्या या रुग्णांकडून बºयाचदा निर्धारित दरांपेक्षा जास्त दर आकारतात.
मुंबई : शहर-उपनगरातील रक्तपेढ्या या रुग्णांकडून बºयाचदा निर्धारित दरांपेक्षा जास्त दर आकारतात. या पार्श्वभूमीवर नुकतीच राज्य रक्त संक्रमण परिषदेने रक्तपेढ्यांची तपासणी केली असता, काही रक्तपेढ्या जादाचे दर आकारत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याविषयी राज्य रक्त संक्रमण परिषदेने शहर-उपनगरातील २२ रक्तपेढ्यांकडे स्पष्टीकरण मागविले असून, त्यानंतर कारवाईच्या निर्णयाची अंतिम बैठक घेण्यात येणार आहे.
राज्य रक्त संक्रमण परिषदेने केलेल्या तपासणीनुसार काही रक्तपेढ्या अधिक दर आकारत आहेत. शिवाय, २२ रक्तपेढ्यांमध्ये काही खासगी रक्तपेढ्यांचा समावेशही आहे. बºयाचदा परिषदेकडे अधिक दर आकारत असल्यासंबंधीच्या तक्रारी दाखल होतात.
त्यानुसार, परिषदेने या रक्तपेढ्यांची चौकशी करून रक्तदरांबाबत अहवाल मागविला होता. त्यात अनेक रक्तपेढ्या उत्तरे देण्यास आणि अहवाल सादर करण्यास असमर्थ ठरल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ.अरुण थोरात यांनी सांगितले. नुकतेच रक्तपेढ्यांचे सर्वेक्षण पार पडले असून, यातून हे निरीक्षण पुढे आले आहे. याविषयी लवकरच बैठक बोलावून त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. यात रक्तासाठी जादा पैसे का आकारले जात आहेत? याबाबत स्पष्टीकरण मागितले जाईल.
या २२ रक्तपेढ्यांमध्ये नानावटी रुग्णालय रक्तपेढी (विलेपार्ले), होली फॅमिली रुग्णालय रक्तपेढी (वांद्रे), बी. डी. पाटील रुग्णालय रक्तपेढी, एचएन रुग्णालय रक्तपेढी (गिरगाव), बॉम्बे रुग्णालय रक्तपेढी(मरिन लाइन्स), हिंदुजा रक्तपेढी (माहिम), लिलावती रुग्णालय रक्तपेढी(वांद्रे), फोर्टिस रुग्णालय रक्तपेढी(मुलुंड), मसीना रुग्णालय रक्तपेढी (भायखळा), एसएल रहेजा रुग्णालय रक्तपेढी (माहिम), मीनाताई ठाकरे रक्तपेढी (गोरेगाव), हेमॅटॉलॉजी लॅबोरेटरी (आॅपेरा हाउस), कोहिनूर रुग्णालय रक्तपेढी(कुर्ला), ब्रिच कँडी रुग्णालय रक्तपेढी (खंबाला हिल), ग्लोबल रुग्णालय रक्तपेढी (लोअर परळ), सायन रक्तपेढी (सायन), कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रक्तपेढी (अंधेरी), बाळासाहेब ठाकरे रक्तपेढी (जोगेश्वरी) यांचा समावेश आहे. मानस सेरोलॉजी इन्स्टिट्यूट रक्तपेढी आणि पल्लवी रक्तपेढी या दोन रक्तपेढ्यांनी परिषदेकडे स्पष्टीकरण पाठविले नाही.