Join us

राष्ट्रगीतावरील भय्याजी जोशींच्या वक्तव्यावर आरएसएसकडून स्पष्टीकरण

By admin | Published: April 02, 2016 9:26 PM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी राष्ट्रगीत किंवा तिरंग्यामध्ये कोणताही बदल करण्यास सांगितलेलं नाही असं स्पष्टीकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) दिलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. २ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी राष्ट्रगीत किंवा तिरंग्यामध्ये कोणताही बदल करण्यास सांगितलेलं नाही असं स्पष्टीकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) दिलं आहे. भय्याजी जोशी फक्त राज्याची आणि देशाची ताकद यातील फरक सांगत होते असं स्पष्टीकरण दिलं आहे. कुठेही त्यांनी राष्ट्रगीतात किंवा तिरंग्यात बदल करण्यास सांगितलेला नाही असं वक्तव्य आरएसएसचे प्रवक्ते मनमोहन वैद्य यांनी केलं आहे. 
 
मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना भय्याजी जोशी यांनी 'जन गण मन' ऐवजी 'वंदे मातरम्' हे राष्ट्रगीत असावे अशी मांडली होती. तसेच 'भगवा ध्वज हा देशाचा राष्ट्रध्वज बनावा' असेही त्यांनी म्हटले होते. भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता पाहता आरएसएसने लगेच स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
 
1947मध्ये भारतीय संविधानाने तिरंग्याचा देशाचा राष्ट्रध्वज म्हणून स्विकार केला होता. त्याचा आदर करणं प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्राचीन संस्कृतीचं प्रतीक म्हणून भगव्याचा प्राचीन काळापासून आदर केला जात आहे. आम्ही तिरंगा जो आपला राष्ट्रध्वज आहे आणि भगवा जो आपल्या प्राचीन संस्कृतीचं प्रतीक आहे दोघांचा आदर करतो असं मनमोहन वैद्य बोलले आहेत. 
 
त्याचप्रमाणे 'जन गण मन' राज्यांच्या संकल्पनेच वर्णन करत तर 'वंदे मातरम' आपल्या संस्कृतीची ओळख आणि एकनिष्ठता दाखवून देतं. सर्वांनी दोन्हींचा समान आदर करणे गरजेचं असल्याचं मनमोहन वैद्य यांनी सांगितलं आहे.